मुंबई : प्रतिनिधी
आमदारकीचा राजीनामा देऊन आपापल्या पक्षाला धक्का देणार्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी शेकडो पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह बुधवारी (दि. 31) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती अभेद्य राहणार असून, या वेळी बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. येत्या 15 दिवसांत जागावाटपाबाबतचा निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश करणार्यांमध्ये जावळी (सातारा)चे शिवेंद्रसिंहराजे भोसले, ऐरोली (नवी मुंबई)चे संदीप नाईक, अकोले (नगर)चे वैभव पिचड आणि वडाळा (मुंबई)चे कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले, माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांनीही या वेळी ‘कमळ’ हाती घेतले.
मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार मंदा म्हात्रे हेही उपस्थित होते.
आपल्या मनोगतात मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, काही भाजपच्या जागा शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत, तर काही शिवसेनेच्या जागा भाजपकडे येऊ शकतात. अशी जागांची अदलाबदल करण्याचा निर्णयही 15 दिवसांत घेऊन जागावाटप निश्चित करण्यात येईल.
आजपासून महाजनादेश यात्रा
आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही युतीचेच सरकार राज्यात आणणार आहोत; नव्हे राज्यातील जनताच आमचे सरकार आणणार आहे. त्यासाठी उद्यापासून राज्यात महाजनादेश यात्रा सुरू होत असून, या यात्रेदरम्यान जनादेश युतीच्या बाजूने वळवण्याचे काम आपण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper