कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी कामोठ्यातील वीज पुरवठा तक्रारी संदर्भात मा. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ.(कामोठे विभाग) भिंगारी, पनवेल यांचे कार्यालयात कामोठे भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश गायकर यांचे समवेत एक निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी पहिली मागणी अशी केली की, 24 जुलै रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या वेबिनारमध्ये असे निदर्शनास आले की मानसरोवर आणि खांदेश्वर स्टेशन लगत उभारण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचे चालू असलेल्या कामासाठी आपण तात्पुरती विद्युत जोडणी दिलेली आहे त्यामुळे त्या परिसरातील उपकेंद्रांना जास्तीचा भार सहन करावा लागतोय. त्यामुळे वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठ्याचा त्रास नियमित वीजबिल भरणार्या सर्वसामान्य ग्राहकांना होत आहे. खरं म्हणजे या योजनेच्या जागेला कामोठेतील रहिवाशांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. या रहिवाशांच्या भावनेचा विचार करता अशाप्रकारे त्या प्रकल्पाला दिलेली जोडणी अयोग्य आहे. खरं म्हणजे या प्रकल्पांच्या विद्युत पुरवठ्यासाठी स्वतंत्र सब स्टेशनसाठी जागा सिडकोने महावितरण कंपनीला हस्तांतरित करणे आवश्यक आहे. जर हा वीज पुरवठा खंडित केला तर सिडको आपल्याला सबस्टेशनसाठी जागा देण्यासाठी त्वरेने निर्णय घेईल आणि सबस्टेशन उभारून नियमित वीज पुरवठा करता येईल.
या निवेदनात दुसरी मागणी अशी केली की, कामोठे विभागातील वीजपुरवठा हा अनियमित स्वरूपाचा आहे. वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यने रहिवासी त्रस्त झालेले आहेत. यासंदर्भात 24 जुलैच्या वेबिनारमध्ये महावितरण अधिकार्यांकडून असे सांगण्यात आले की काही सब स्टेशनला जास्त भार आहे. त्यामुळे तेथील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्याला अनुसरून कामोठे विभागातील सर्व स्टेशनचा भार समप्रमाणात विभागणी करण्यात यावा आणि तो वाजवी पेक्षा जास्त होत असेल तर नव्याने सब स्टेशनची निर्मिती करण्यात यावी. कामोठेची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विजेची मागणी देखील वाढत चालली आहे. या निवेदनात त्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडून त्वरित कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे, अन्यथा भविष्यात महावितरणला कामोठ्यातील जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागू शकते हा इशारा देखील दिला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper