ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
महाड : प्रतिनिधी
ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याजवळ असलेल्या बावले गावात जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
महाड, पोलादपूर तालुक्यात 2005मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक ठिकाणी भूस्खलन झाले होते. त्यानंतर शासनाकडून दोन्ही तालुक्यांतील डोंगराळ परिसर आणि जमिनीचे भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण करण्यात आले, पण जे उपाय योजणे आवश्यक होते त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. किल्ले रायगड परिसरात असलेली अनेक गावे डोंगरउतारावर आहेत. कावले, बावले, सांदोशी, करमर, आमडोशी, पुनाडे, नेवाळेवाडी, हिरकणी आडी या पायथ्याजवळ असलेल्या गावांना धोका निर्माण झालेला आहे.
बावले गावाची लोकसंख्या सुमारे 200 असून या गावातील शेवंताबाई कडू यांच्या ओसाड जमिनीला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे शुक्रवारी आढळून आले. त्याच गावातील चंद्रकांत महाडिक हे रानात गेले असता जमिनीच्या भेगा प्रत्यक्ष पाहून तेही भयभीत झाले. हा प्रकार त्यांनी ग्रामस्थांना सांगितला तसेच महाड येथील तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. ही माहिती मिळताच तहसीलदार सुरेश काशीद, नायब तहसीलदार प्रदीप कुडाळ, पोलीस उपअधीक्षक निलेश तांबे घटनास्थळी रवाना झाले.
प्रशासनाकडून रायगड परिसरातील काही गावांची पाहणी केल्यानंतर जमिनीला भेगा पडलेल्या असल्याचे आढळून आले. या परिसराची आता भूवैज्ञानिक विभागाकडून पाहणी करण्यात येणार असून सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य ते उपाय प्रशासनाकडून योजले जातील, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper