समई, बांगडी आणि नाण्यांचा समावेश
महाड : प्रतिनिधी
पुरातत्व विभागाच्या वतीने रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या उत्खननात मातीत गाडला गेलेला ऐतिहासिक वारसा समोर येत आहे. गेल्या कांही दिवसांत समई, नाणी आणि कोरीव काम केलेली सोन्याची बांगडी आढळून आली आहे.
रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर विविध विकास कामे केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पुरातन विभागाकडून किल्ल्यावरील जुन्या घरांच्या जोता (पाया) चे उत्खनन करण्यात येत आहे. त्यामध्ये अनेक वस्तू बाहेर आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी जगदीश्वर मंदिर परिसरात अशाच प्रकारे उत्खनन सुरू असताना काही वस्तू समोर आल्या. यामध्ये एक समई, अंगठी, बांगडी आणि नाणी सापडली आहेत. याबाबत प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आश्चर्य व्यक्त करीत पुरातत्त्व विभागाचे कौतुक केले. जी बांगडी सापडली आहे, ती नक्षीकाम केलेली आणि पूर्ण बांगडी मिळाल्याचे सांगून अशा उत्खननातून इतिहासाला एक वेगळे वळण मिळणार असून मातीत दडलेला इतिहास बाहेर येण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper