निद्रिस्त राज्य सरकारचा भाजपकडून निषेध
महाड : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाचा फटका हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडलादेखील बसला आहे. पोल पडल्याने गडावरचा वीजप्रवाह गेल्या 15 दिवसांपासून खंडित आहे. याविरोधात निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 18) निषेध व्यक्त करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मते मागायची आणि आज त्याच महाराजांची राजधानी गेली 15 दिवस अंधारात आहे याचे आघाडी सरकारला सोयरसुतक नाही. म्हणूनच या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि राज्यकर्त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी महाड भाजपने किल्ले रायगडाच्या पायथ्याला असलेल्या चित्त दरवाजा येथे राज्य सरकारविरोधात घोषणा देत भोंगळ कारभाराचा निषेध केला. या वेळी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कुंदे यांना खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.
स्वराज्याच्या राजधानीवरील अंधार दूर झाला नाही, तर उग्र आंदोलन करू, असा इशारा या वेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन महामूणकर यांनी दिला. या वेळी तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, संदीप ठोंबरे, महेश शिंदे, चंद्रजित पालांडे, अप्पा सोंडकर, महेश सावंत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper