माऊंट माऊंगनुई : वृत्तसंस्था
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यात सात धावांनी विजय मिळवत मालिका 5-0ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करीत 163 धावा केल्या होत्या, मात्र प्रत्यत्तरात न्यूझीलंडला 9 बाद 156 धावाच करता आल्या. न्यूझीलंडच्या भूमीवर याआधी कोणत्याही संघाला द्विपक्षीय मालिकेत असा विजय मिळवता आलेला नाही.पाचव्या सामन्यात भारताने दिलेले 164 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची आघाडीची फळी अवघ्या 17 धावांत माघारी परतली. त्यानंतर रॉस टेलर आणि टीम सेइफर्ट यांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. नवदीप सैनीने सेइफर्टला बाद करीत भारताला ब्रेक मिळवून दिला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने एकाच षटकात दोन गडी बाद करीत न्यूझीलंडची अवस्था 7 बाद 132 अशी केली, तर सैनीने न्यूझीलंडचा अखेरचा भरवशाचा फलंदाज रॉस टेलरची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून बुमराहने सर्वाधिक तीन बळी टिपले. नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर यांनी दोन, तर वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली. त्याआधी विराट कोहलीच्या गैरहजेरीत कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केएल राहुल व संजू सॅमसन यांनी भारतीय डावाची सुरुवात केली, मात्र संजू सलग दुसर्या सामन्यात अपयशी ठरला. त्यानंतर रोहित व राहुल यांनी दुसर्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. राहुल 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर शर्माने अर्धशतक पूर्ण केले. पायाला दुखापत झाल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्याने नाबाद 60 धावा केल्या. शिवम दुबेला पुन्हा अपयश आले. अखेरच्या षटकात श्रेयस अय्यर व मनीष पांडे यांनी आक्रमक खेळ करून संघाला 163 धावांपर्यंत पोहचवले.
RamPrahar – The Panvel Daily Paper