कोळी समाज संघाचा आंदोलनाचा पवित्रा, तहसिलदारांना दिले निवेदन


रोहे ः प्रतिनिधी
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाणी येत असल्याने कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. यामुळे नदीतील जलचर मृत्यूमुखी पडत असून, त्याची पैदास कमी होत आहे. मागच्या आठवड्यात कुंडलिका नदी पात्रातील मासे मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे या नदीत मासेमारी करणार्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन कोळी समाज संघाचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव पोकळे व शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत कारभारी यांनी तहसिलदार कविता जाधव यांना दिले.
गेल्या अनेक वर्षापासून धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून रसायनयुक्त सांडपाणी थेट कुंडलिका नदीच्या पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडतात. याबाबत आतापर्यंत तहसिलदार, कोकण आयुक्त, प्रदुषण नियंत्रण मंडळाला निवेदने दिली, आंदोलने केले. मात्र आतापर्यंत ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. कुंडलिका नदीच्या पात्रातील मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार होत असल्याने येथील मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने करण्यात आली आहे. ही नुकसान भरपाई न मिळाल्यास सहकुंटुंब आंदोलन करण्याचा इशारा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper