बच्चे कंपनी घेताहेत पाण्यात डुबण्याचा आनंद
रोहे ः प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात सगळ्यात कमी प्रदुषीत म्हणून कुंडलिका नदीची ओळख आहे. निर्मळ वाहणार्या या नदीच्या पात्रात सायंकाळी मोठया प्रमाणात नागरिक व लहान मुले पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. तर सायंकाळी या परिसरात फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. रोह्याची जीवन वाहनी म्हणून ओळख असलेल्या कुंडलिका नदीवर जुना पुल (पकटी) आहे. अष्टमी व रोह्यास जोडणारा कुंडलिका नदीवरील सगळयात जुना पुल (पकटी) सध्या नागरिकांनी व बच्चे कंपनीनी गजबजलेला दिसतो. नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या खडकाळ जागेवर बसण्यासाठी आणि नदीमध्ये पोहण्यासाठी सध्या रोहेकर नागरिक बाळगोपाळांना घेऊन येताना दिसतात. काही नागरिक या ठिकाणी पाहुण्यांसह चणेफुुटणे व शेंगदणे खाताना दिसतात. त्यामुळे सध्या तरी कुंडलिका नदी रोहेकरांचे व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना व खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कुंडलिका नदीचे पाणी स्वाध्यायी पवित्र मानत असल्याने ते या नदीस भेट देत असतात. व या निर्मळ व बारमाही वाहणार्या या नदीचे पाणी तिर्थ म्हणून आपल्या गावी घेऊन जात असतात. सध्या कुंडलिका नदी परिसरात तरूण तरूणींसह ज्येष्ठ नागरिक बाळगोपाळासह सेल्फी काढताना दिसतात. त्यामुळे हे ठिकाण सेल्फी पाँईट बनले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper