नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला अटक केलेली आहे. सुशील कुमार सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुशील कुमारला उत्तर रेल्वेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सुशील कुमार याच्यावरील गुन्हा प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित केले जात आहे, असे रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यातच सागर राणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात सुशीलकुमारसह सहा जणांवर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली मॉडल टाऊन परिसरातील एका फ्लॅटवरून दोन्ही गटात भांडण झाले होते. सुशील कुमारने या प्रकरणानंतर कोणत्याही पैलवानाचा हात नसल्याचे म्हटले होते, मात्र प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार मृत सागरला मारहाण करताना दिसून आला होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper