नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर होताच सर्व पक्ष विजयाचा दावा करत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
पाच वर्षे फक्त खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल करणार्या, व्होट बँकेच्या राजकारणासाठी शांतता भंग करणार्या पक्षांना राज्यातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले. दिल्लीच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा असतील, असे संकेतही त्यांनी दिले.
अमित शहा यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच, ट्विट करून सत्ताधारी आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडलं. दिल्लीतील जनता खोटी आश्वासने देणार्या आणि त्यांची दिशाभूल करणार्यांना धडा शिकवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि भाजपवर जनता विश्वास ठेवणार, असं शहा म्हणाले.
आम आदमी पक्षानं पाच वर्षांत केवळ आश्वासनं दिली. शेवटच्या तीन महिन्यांत जनतेचा पैसा जाहिरातींवर खर्च केला. दिल्लीतील लोक आजही मोफत वाय-फाय, 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे, नवीन महाविद्यालये आणि रुग्णालये आदी सुविधांची प्रतीक्षा करत आहेत, असं शहा म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तेथे 8 फेबु्रवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
गरिबांचे पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक आयुष्मान योजनेतून मोफत उपचाराचा गरिबांचा अधिकार हिसकावून घेणार्यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी आहे. व्होट बँकेच्या राजकारणासाठी दिल्लीतील शांतता भंग करणार्यांचा सुपडा साफ करण्यासाठी ही निवडणूक आहे.
– अमित शहा, भाजप अध्यक्ष
RamPrahar – The Panvel Daily Paper