Breaking News

…केला होता अट्टाहास!

‘अखेर गंगेत घोडे न्हाले’ अशीच सामान्य प्रतिक्रिया राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींनंतर सर्वत्र ऐकावयास मिळते आहे. असो, झाले गेले गंगेला मिळाले. कुटील राजकारणाची उठाठेव सोडून ठाकरे सरकार आतातरी कोरोनाच्या लढाईत पूर्ण ताकदीनिशी उतरेल अशी आशा आहे.
प्रचंड आटापिटा आणि उलटेसुलटे राजकारण करून, सारा विधिनिषेध गुंडाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तीन चाकी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्याला येत्या 28 तारखेला सहा महिने पूर्ण होतील.
मतदानाचा कौल महाराष्ट्राच्या जनतेने या तिन्ही सत्ताधारी पक्षांना दिला नव्हता, किंबहुना जनमत त्यांच्या विरोधातच होते. सर्वाधिक 105 जागा मिळवून सत्तेच्या निकट पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाला अखेर मित्रपक्षानेच विश्वासघात करून सत्तेपासून दूर ठेवले. ज्यांच्या विरोधात हिरीरीने निवडणुका लढवल्या त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अपवित्र हातमिळवणी करून सत्ता काबीज केली. जनमत अनुकूल नव्हतेच, तसेच महाराष्ट्रासारख्या विशाल राज्याचे नेतृत्व करू शकेल, असे समर्थ नेतृत्व देखील या तिन्ही पक्षांकडे नव्हते व नाही. तरीही केवळ अट्टाहासापोटी शिवसेनेने सारी नीतीमूल्ये खुंटीला टांगून तीन चाकी सरकार बनवले. मुख्यमंत्री पद तसे सुखासुखी कुणालाही मिळत नसते. उन्हातान्हात लोकांमध्ये फिरून मेहनतीने आपले राजकीय कौशल्य पणाला लावल्यानंतरच या
सर्वोच्च पदाची माळ गळ्यात पडते हा महाराष्ट्रातील लोकशाहीचा इतिहास आहे. परंतु काही नशीबवान नेत्यांना मात्र रात्री-अपरात्री पंचतारांकित
हॉटेलांमध्ये खलबते करून विनासायास हे पद मिळवता येते हे बदललेल्या राजकारणाचे द्योतक मानावे लागेल. जनतेतून निवडून दिलेला नेता मुख्यमंत्रीपदी असावा असा लोकशाहीतील एक अलिखित संकेत आहे, त्याला हरताळ फासून विधान परिषदेच्या मागल्या दाराने विधिमंडळात प्रवेश करण्याचा प्रचंड मोठा खटाटोप मात्र ठाकरे यांना करावा लागला. हे सारे राजकारण सुरू असतानाच कोरोना विषाणूच्या साथीचा दुर्दैवी घाला अवघ्या जगासोबतच महाराष्ट्रावरही पडला. साहजिकच मागल्या दाराने विधिमंडळात शिरण्याचे शिवसेनेचे राजकारण पुरते नासले. कुठल्याही परिस्थितीत 27 मेच्या आत आमदारकीचा खुंटा बळकट करण्यासाठी शिवसेनेने राजकारणाची जी पातळी गाठली त्याला तोड नाही. महामहीम राज्यपालांच्या विरोधात अत्यंत हीन दर्जाची टीका करण्यात आली. विधानपरिषद निवडणुकीच्या राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या भारतीय जनता पक्षावर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निष्कारण आगपाखड करण्यात आली. कुठलीही मात्रा चालेनाशी झाल्यावर अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच धाव घेतली. विरोधी पक्षाच्या सर्वोच्च
नेत्याच्या मदतीनेच खुर्ची अबाधित ठेवण्याचा हा भारतीय लोकशाहीतला पहिलाच प्रसंग असावा. महाविकास आघाडीच्या पाच आणि भारतीय जनता पक्षाच्या चार आमदारांनी सोमवारी दुपारी विधिवत शपथ घेतली. या नऊ आमदारांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या हे योग्यच झाले. कोरोनाच्या संकट काळात निवडणुकांची राळ उठणे आत्मघातकीच ठरले असते. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सर्वच आमदारांच्या नेमणुका बिनविरोध झाल्याने सामाजिक अंतर राखण्याचा (सोशल डिस्टन्सिंग) नियम देखील पाळला गेला. महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अत्यंत प्रगल्भपणे राजकीय परिस्थिती हाताळून मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्तेचा मार्ग निष्कंटक केला. याच राज्यपालांना शिवसेनेच्या काही नेत्यांनी वेडीवाकडी दूषणे दिली होती. त्याबाबत ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली असती तर बरे झाले असते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply