मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून तीव्र विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली होती, मात्र राज्याचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन राज यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. आता राज यांच्या या आवाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात याकडे महाराष्ट्राचे नक्कीच लक्ष असेल.
RamPrahar – The Panvel Daily Paper