नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोकणात पाणीटंचाई जाणवत असून, 242 गावे व 675 वाड्यांना 132 टँकर आणि चार अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुमारे दोन लाख 20 हजार 239 नागरिकांना या पाणीपुरवठयामुळे दिलासा मिळाला आहे.
एप्रिल महिन्यापासूनच कोकण विभागात सर्वत्र उन्हाची दाहकता जाणवू लागल्याने ज्या गावांमध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण होते त्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याची पूर्वतयारी करण्यात आली होती. 25 मेपर्यंत ठाणे जिल्ह्यातील 62 गावे व 187 वाड्यांना 42 खाजगी टँकर्सव्दारे, पालघर जिल्ह्यातील 34 गावे व 107 वाड्यांना 37 खाजगी टँकरव्दारे, रायगड जिल्ह्यातील 83 गावे व 253 वाड्यांना 37 खाजगी टँकरव्दारे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 63 गावे व 128 वाड्यांना सात शासकीय व नऊ खाजगी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला.पाण्याचा पुरवठा करताना संबंधित कंत्राटदारांना कोरोनाविषयी सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. टँकरव्दारे पुरविण्यात येणार्या पाण्याच्या स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देण्यात येत आहे, असे कोकण विभागीय महसूल उपायुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper