
कर्जत ः प्रतिनिधी
जगभर कोरोनाचे संकट आल्याने गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा यासाठी शासनाने अनेक नियम तयार केले आहेत. दरवर्षी तयार सजावटीची अनेक दुकाने कर्जत तालुक्यात असतात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दुकाने आहेत. बांबूपासून तयार केलेल्या सजावटीला विशेष मागणी आहे. गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी बाजारपेठा फुलल्या आहेत.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा गणेशोत्सव कोरोना संकटाच्या सावटाखाली साजरा करावा लागणार आहे. थर्माकोल आणि प्लास्टिक वापरावर निर्बंध आल्याने गणेशोत्सवासाठी सजावट करण्यासाठी कापड, कागद आणि बांबूचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. अशा सजावटी तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अनेक ठिकाणी कलाकार सजावटी करण्यात मग्न झाले आहेत. दरवर्षी हजारोंच्या संख्येने सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. हा आकडा प्रतिवर्षी वाढतच असतो, मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने शासनाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक नियम केले आहेत. त्यामुळे घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपर्यंत, तर सार्वजनिक गणेशमूर्ती चार फुटांपर्यंत असावी असे सुचविण्यात आले आहे. त्यामुळे हौशी मंडळींची पंचाईत झाली आहे. साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळे प्रयत्नशील आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper