Breaking News

कोरोना आणि मानवी जीवन

मानवी जीवन अमूल्य असून जीवनात जर कुठली गोष्ट महत्त्वाची असेल तर ती आहे आरोग्य. वैश्विक कोरोना महामारीत आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे. म्हणूनच तर एरवी आरोग्याकडे कळत-नकळतपणे दुर्लक्ष करणारी मंडळीही अलीकडच्या काळात आरोग्याबाबत सजग झाल्याचे दिसून येते. कोरोनाने संपूर्ण जगभरात अक्षरश: वाताहत केली. एखादे वादळ येऊन गेल्यानंतर नव्याने कसे उभे राहायचे असा विचार करीत असताना पुन्हा नवे वादळ येऊन धडकावे तशा कोरोनाच्या लाटा उसळत असून त्या मानवाला जणू गिळंकृत करीत आहेत. या लाटांमध्ये अनेकांचा बळी गेला असून कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सलग दुसर्‍या वर्षी कायम आहे. आपल्या देशालाही या संकटाची झळ बसली. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असतानाच तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे. शिवाय कोविड-19 विषाणू नवनवी रूपे घेऊन अधिक धोकादायक पद्धतीने समोर येत आहे. एकीकडे कोरोना संकटात आरोग्य धोक्यात आले तर दुसरीकडे लॉकडाऊन, निर्बंधांमुळे जगणे कठीण झाले, परंतु हळूहळू अशा जगण्याचीही सवय सर्वांना होऊ लागली आहे. कधी कधी वाईटातूनही चांगले घडते, असे म्हटले जाते. कोरोना महामारीत लोक आरोग्याकडे गांभीर्याने पाहू लागले. त्या दृष्टीने जीवनशैली बदलली, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या. यानिमित्ताने स्वच्छतेविषयीही जागरूकता वाढली. त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की साथीचे रोग जवळपास नाहीसे झाले आहेत. पूर्वी पावसाळ्यात साथरोगांचा हमखास फैलाव होत असे, परंतु आता ते लुप्त झाल्याचे चित्र आहे. कोरोना हा महाभयंकर आजार सर्वांची चिंता वाढवणारा आहे. प्रत्येकाला काळजी करायला लावणारा आहे, पण म्हणून त्याला घाबरून त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही. त्याऐवजी त्याची लागण होऊ नये यासाठी दक्षता, सतर्कता आवश्यक आहे. तरीही संसर्ग झाल्यास वेळेत व योग्य उपचार घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकता येते. भारतासह जगभरात मोठ्या संख्येने लोक कोरोनातून बरे झालेले आहेत. अगदी प्रबळ इच्छाशक्तीद्वारे वयोवृद्धांनीदेखील कोरोनावर मात करून ते ठणठणीत बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अर्थात ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना आहेच. कोरोनावर बाजारात आता अनेक औषधे उपलब्ध होत आहेत. मुख्य म्हणजे लसींची निर्मिती झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असून त्यातून कोरोना संक्रमणापासून मृत्यूचा धोका कमी झाला आहे. संसर्गजन्य असलेला कोरोना यापुढेही असणार आहे. त्यामुळे त्याला गृहित धरूनच मार्गक्रमण करायचेे आहे. कोरोनाविषयक नियम पाळून स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घ्या आणि सकारात्मक विचारांनी जीवन जगा याच दै. राम प्रहरच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

-समाधान पाटील, पनवेल

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply