कोलकाता : वृत्तसंस्था
आंद्रे रसेलच्या धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 218 धावा करता आल्या. कोलकात्याकडून रॉबिन उथप्पा आणि नितिश राणा यांनी अर्धशतके झळकावली होती. रसेलने या वेळी 17 चेंडूंत 3 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 48 धावा फटकावल्या, त्याचबरोबर त्याने ख्रिस गेल आणि सर्फराझ खान यांनाही बाद केले. त्यामुळे रसेललाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम कोलकात्याच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ख्रिल लिनच्या रूपात कोलकात्याला पहिला धक्का
बसला, पण सुनील नरिनने धडाकेबाद फलंदाजी केली. नरिनने 9 चेंडूंत 24 धावा केल्या. त्यानंतर नितिश राणा आणि रॉबिन उथप्पा यांनी 110 धावांची भागीदारी रचली. राणाने दमदार फलंदाजी करताना 34 चेंडूंत दोन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 63 धावांची तुफानी खेळी साकारली.
कोलकात्याच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची चांगली सुरुवात झाली नाही. लोकेश राहुलला एक धाव करता आली, तर गेल 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर मयांक अगरवाल आणि डेव्हिड मिलर यांनी पंजबाचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. अगरवालने 34 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 58 धावांची खेळी साकारली.
RamPrahar – The Panvel Daily Paper