रोमहर्षक लढतीत राजस्थानचा ‘रॉयल’ विजय
कोलकाता : वृत्तसंस्था
युवा खेळाडू रियान परागने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर तीन गडी राखून गुरुवारी (दि. 25) मात केली. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना पराग बाद झाला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने संघाला विजय मिळवून दिला. कोलकात्याचा हा सलग सहावा पराभव ठरला. या पराभवामुळे कोलकाता संघाची गुणतालिकेत घसरण होऊन तो थेट सहाव्या स्थानी गेला आहे.
कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाने आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. सुनील नारायणने रहाणेला माघारी धाडल्यानंतर राजस्थानच्या डावाला खिंडार पडले. संजू सॅमसन, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी ठराविक अंतराने माघारी परतले. अखेरीस रियान परागने जोफ्रा आर्चरच्या साथीने फटकेबाजी करीत राजस्थानला विजयपथावर आणून ठेवले. कोलकात्याकडून पीयूष चावलाने तीन, सुनील नारायणने दोन, तर प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्याआधी, कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर घरच्या मैदानावर खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने 175 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या षटकापासून राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या फलंदाजांवर अंकुश लावला होता. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा स्टिव्ह स्मिथचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. धवल कुलकर्णीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या वरुण अरॉनने आपली चमक दाखवत कोलकात्याच्या सलामीच्या फळीतल्या फलंदाजांना माघारी धाडले.
ख्रिस लिन आणि शुभमन गिल हे कोलकात्याचे दोन्ही सलामीवीर या सामन्यात अरॉनचे बळी ठरले. यानंतर नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली, मात्र श्रेयस गोपाळने नितीश राणाला माघारी धाडत कोलकात्याला धक्का दिला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. दिनेश कार्तिकने अखेरपर्यंत किल्ला लढवत नाबाद 97 धावा केल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper