नवी मुंबई : बातमीदार
कोरोनामुळे आलेला तणाव दूर करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मानसोपचार कक्षा स्थापन केला आहे. त्यानुसार नागरिकांना तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे. कोविड -19 मानसोपचार कक्ष अशी संकल्पना आहे.
या कक्षाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील मानसोपचार तज्ज्ञ कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांप्रमाणेच क्वारंटाइन असलेले नागरिक यांचे मनोबल वाढविण्याची महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांशी महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून मनमोकळा संवाद साधत कोरोनाविषयीची भीती, त्यामुळे निर्माण झालेला मानसिक तणाव व समज, गैरसमज दूर करणार आहेत.
क्लिनीकल सायकोलॉजिस्ट सलमा प्रभु या मानसोपचार क्षेत्रातील तज्ज्ञ या कोविड-19 मानसोपचार कक्षाच्या समन्वयक असणार असून त्यांच्यासह सात मानसोपचार क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ हे कौरोना पॉझिटिव्ह रूग्ण यांचे समुपदेशन करणार आहेत. या लोकोपयोगी कामाकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठ मानसोपचार तज्ज्ञ सामाजिक जबाबदारीचे आन ठेवून स्वयंस्फुर्तीने पुढे आले आहेत. याविषयी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ही कल्पना मांडली होती. त्यास मूर्त स्वरूप आले आहे.
क्लिनीकल सायकोलॉजिस्ट सलमा प्रभू यांना अन्य मानसोपचार तज्ञ ऋतिका लिखाते, शहिस्ता अस्लम काझी, अनुजा नवरत्न, विधी ललका, लावण्या नवरत्न, दिपाली ठक्कर, रूपाली हेगडे या नानसोपचार तज्ज्ञ आपली मार्गदर्शनपर सेवा उपलब्ध करून देणार आहेत. नागरिकांमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या 022-35155012 या कॉल सेंटरवरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास या क्लिनिकल सायकॉलॉजिस्टशी व्हच्युअल कॉल जोडला जाऊन नागरिकांचा त्यांच्याशी सहज संवाद साधला जाणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper