Breaking News

खाडी किनारी डेब्रिजचे ढीग

नवी मुंबई : बातमीदार  : सायन पनवेल महमार्गालगत असलेल्या खारघर येथील खाडीकिनारी डेब्रिज रिते केले जात आहे. सध्या खारघर शहराचा विकास हा खाडीकिनार्‍यापर्यंत पोहोचलेला आहे. पनवेल येथून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या बाजूला अनेक बांधकामे होत आहेत. कांदळवनांचा हा भाग असलेल्या परिसरात खारघर स्थानकापर्यंत बांधकामे पोहोचलेली आहेत, मात्र या बांधकामांचे निमित्त साधत डेब्रिज माफियांनी या खाडी किनार्‍याला वेढलेले आहे. अंधाराचा फायदा घेत डेब्रिज थेट कांदळवनांवर टाकले जात आहे.

पनवेल महापालिकेतील सर्वाधिक स्मार्ट भाग म्हणून खरघरची ओळख आहे. त्यात महापालिकेला सर्वाधिक रेव्हेन्यू मिळवून देणारा भाग म्हणून खारघरला ओळखले जाते. पनवेलमधील इतर भागांपेक्षा खारघर विभागाला जास्त किंमत आहे. त्याचाच भाग म्हणून विकसकांचे खरघरकडे विशेष लक्ष आहे. मुख्य खरघरमधील भाग विकसित केल्यावर रेल्वेस्थानक ते खाडी किनारी असलेल्या भागात टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळेच की काय एकप्रकारे या भागाला डेब्रिजने ग्रासले आहे. बांधकामाचे डेब्रिज उर्वरित खाडी किनारी आणून टाकले जात आहे, तर नवी मुंबई व पनवेलच्या इतर भागांतून येणारे डेब्रिज देखील इथे टाकले जात आहे असे येथील प्रत्यक्षदर्शी सांगतात. महत्त्वाची बाब म्हणजे डेब्रिजने जमिनी व्यापून टाकल्यावर हे डेब्रिज माफिया कांदळवनांकडे सरकत आहेत. त्यामुळे अंधाराचा व निर्मनुष्य वस्तीचा फायदा घेत  थेट डेब्रिज कांदळवनांवर रिते केले जात आहे. त्यामुळे नक्की हे डेब्रिज माफियांचे काम आहे की जमीन हडपणार्‍या भूमाफियांचे असा प्रश्न पडतो. याबाबत पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, सिडकोकडे या विभागाची जबाबदारी आहे. खुल्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यास मज्जाव करणे व कांदळवन वाचवण्यासाठी सिडकोने प्रयत्न करणे गरजेचे आहे.कांदळवनामुळे सागरी अन्नसाखळी अधिक मजबूत होते. सुनामी किंवा वादळी वार्‍याचा वेग मोठ्या प्रमाणावर अडविण्यास मदत होते. जलचर सृष्टीतील विविध जलचरांना, खेकडा विविध प्रकारचे मासे याबरोबर विविध प्रकारच्या पक्ष्यांना बगळे, स्विफ्ट, कावळे, घार, किंगफिशर, हॉर्नबील वगैरेंना अन्नसाखळीस पोषक वातावरण यामुळे तयार होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply