पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेने कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केलेल्या खारघरमधील घरकुल सोसायटीकडे जाणारे रस्ते पोलिसांनी सील केले आहेत. त्याचप्रमाणे येथे मोकाट फिरणार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पाच पोलिसांची नियुक्तीही करण्यात आली आहे.खारघर सेक्टर 15मधील घरकुल सोसायटीत चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा परिसर कोरोनाबाधित क्षेत्र घोषित करून सील केला होता, मात्र तेथील नागरी व वाहतुकीची रहदारी सुरूच राहिल्याने आता पोलीस सरसावले आहेत. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांनी घरकुलकडे जाणारे रस्ते सील करून तेथे बॅरिकेट्स लावले आहेत. याशिवाय तेथे पाच पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. या परिसरात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper