पनवेल : वार्ताहर
खारघर शहरात व्यापक प्रमाणावर, मोठ्या गृहनिर्माण संकुलात विकसित होत आहेत. या क्षेत्रात मुंबईतून, महाराष्ट्रातून व इतर प्रांतातून स्थलांतरीत झालेली अनेक कुटुंब, वास्तव्य करीत आहेत. अशा या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या ज्येष्ठ नागरिकांकडे वय सिद्ध करण्याकरता कुठलेही अधिकृत ओळखपत्र नसून, ते काढण्यासाठी त्यांना पनवेल सेतूला धाव घ्यावी लागत आहे. अशा या ज्येष्ठ नागरिकांसाठी खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर अससोसिएशन या सेवा भावी संस्थेने ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र सुरू करण्याचे अभियान सुरू केले आहे.
वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांची पनवेल येथे भेट घेऊन, ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या मांडल्या. या वेळी जेष्ठ नागरिकांच्या वतीने लक्ष्मीनारायण गुप्ता यांनी केलेल्या चर्चेत जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळण्यासंदर्भात चर्चा केली. या वेळी प्रांताधिकारी नवले यांनीदेखील सकारत्मक प्रतिसाद देत तहसीलदार विजय तळेकर यांच्याशी चर्चा करून हे अभियान राबविण्याचे निश्चित केले. या भेटीवेळी ऑलिम्पिक विजेत्या तथा उपजिल्हाधिकारी ललिता बाबर याही उपस्थित होत्या.
हे अभियान नुकतेच सुरू झाले असून ते पूर्ण फेब्रुवारी महिना चालू असणार आहे. या अभियानाचा ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खारघर तळोजा वेल्फेअर अससोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रनावडे यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper