Breaking News

खालापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेला मरगळ

विकासकामे कागदावरच

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर पंचायत समितीमधील महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने तालुक्यातील शिक्षण, आरोग्य आणि विकासकामांचा खेळखंडोबा झाला आहे. शिवाय  ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशी प्रकरणाला ब्रेक लागला आहे.

खालापूर तालुका मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत, आणि औद्योगिक प्रगतीत पुढे असूनदेखील विकासाची गंगा गावोगावी पोहचलेली नाही. खालापूर तालुक्यात चव्वेचाळीस ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीचा कारभार पंचायत समिती मार्फत चालविला जातो. परंतु गेली अनेक वर्षे तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई, आरोग्य सुविधा, अंगणवाड्या, शाळा आणि स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. प्रशासकिय यंत्रणेचा कोणताही वचक नसल्यामुळे कारभारात सुसूत्रता आणि ताळमेळ उरलेला नाही. पंचायत समितीमधील तालुका वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी या महत्त्वाच्या पदांवर नेमणूका झाल्या नसल्याने प्रभारी म्हणून कामकाज पाहिले जात आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी पोळ यांच्या बदलीनंतर  त्या जागी नेमणूक झालेली नाही.

पंचायत समितीकडून नियमित दप्तर तपासणी होत नसल्याने तालुक्यातील ग्रामपंचायती भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या आहेत. खालापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते महत्वाची भूमिका बजावत  आहेत.  भ्रष्ट्राचार उघडकीस येईपर्यंत वरिष्ठ अधिकारी डोळ्यावर झापड लावून बसलेत का? असा प्रश्न चौक ग्रामपंचायतीचा भ्रष्ट्राचार उघडकीस आणणारे सुरेश गावडे यांनी केला आहे. स्वच्छता मोहिमेचा तालुक्यात बोजवारा उडला आहे. लोकप्रतिनिधींचा हवा तसा वचकदेखील प्रशासनावर राहिलेला नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायतीच्या कामाची वेळोवेळी दप्तर तपासणी केली, नागरिकांच्या तक्रारींची वेळीच दखल घेतली तर भ्रष्ट्राचाराला आळा बसेल. पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा सुरू असून वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी आहे.

-सुरेश गावडे, माहिती अधिकार कार्यकर्ता, चौक, ता. खालापूर

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply