खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील नावंढे गावात सोमवारी (दि. 11) बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली असून, वनविभागाचे पथक तेथे तळ ठोकून आहे.
नावंढे गावातून केळवली रेल्वेस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर सोमवारी सकाळी 10.30च्या सुमारास रवी हाडप यांना बिबट्याचे दर्शन झाले.बिबट्याला चाहूल लागल्यावर त्याने गवतात धूम ठोकली. बिबट्याच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे.
बिबट्या दिसल्याचे समजतात खालापूर वनविभाग अधिकारी एल. एस. नागोठकर व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ वनाधिकारी गुप्ते तसेच पोलीस अधिकार्यांनीही पाहणी केली. बिबट्याच्या पायाचे ठसे घेण्यात आले असून, तो अंदाजे चार-पाच वर्षांचा असावा, असा अंदाज आहे. पोलीस व वनाधिकार्यांनी नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper