खोपोली: प्रतिनिधी
नगरपंचायत खालापूरमध्ये वर्षभरात ठोस विकास कामे झाली नसून, केवळ बॅनरच्या माध्यमातून विकासनिधीचे आकडे खालापूर नागरिकांना पहायला मिळाले आहेत. खालापूर नगरपंचायत निवडणूकिला जानेवारी वर्ष पूर्ण होत आहे. सत्तापूर्तीचे वर्ष साजरे होत असताना ठळक असे विकास काम दृष्टीस पडलेले नाही. खालापूर नगरपंचायत हद्दीत कोट्यवधीची विविध विकासकामे आणल्याचे बॅनर अनेकदा दर्शनी भागात झळकले. एवढी प्रचंड विकासकामे पाहून सुखावलेल्या खालापूर नागरिकांना वर्ष संपत आले तरी खालापूरात हद्दीत कोणती विकासकामे पूर्णत्वास गेली याचा शोध घ्यावा लागणार आहे. खालापूर नागरिकासाठी समाधानाची बाब म्हणजे खालापूर नगरपंचायतीत सत्ताधारी आणि विरोधक वितुष्ट संपुष्टात आले आहे. एकमेका विरुद्ध निवडणूक लढलेले शिवसेना आणि शेकाप सत्तेत भागीदार झाले आहेत. खालापूर शहरातील पिण्याचा पाणी प्रश्न, वाहनतळ, तीर्थ क्षेत्र महड परिसर विकास, तलाव सफाई, नालेसफाई सह विविध प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. खालापूर नागरिक बॅनरवरील विकास काम प्रत्यक्षात अवतरण्याची वाट पाहत असून खालापूर शहराचा सर्वांगिण विकासासाठी आवश्यक विकास आराखडा देखील मंजूर होण्याची वाट पाहत आहेत.
विकासकाम मंजुरी झाल्यानंतर आवश्यक तांत्रिक बाबीची पूर्तता सुरू आहे. महिनाभरात विकासकामाचा नारळ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते फुटेल.
-सुप्रिया साळुंखे, नगरसेविका खालापूर
RamPrahar – The Panvel Daily Paper