Breaking News

खासदार बारणे आणि आमदार थोरवे यांच्यात का रे दुरावा?

खालापूर ः प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे आणि कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात सध्या विस्तवही जात नसल्याची चर्चा आहे. या दोघांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिक मात्र आपण कोणाबरोबर जायचे या संभ्रमात आहेत.
शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तिकिट नाकारल्याने शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून उमेदवारी लढविली होती. त्या वेळी आमदार सुरेश लाड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. खासदार श्रीरंग बारणे यांनी तिकिट कापल्याची सल थोरवेंना टोचत होती. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत शेकापला काडीमोड देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून अखेर तिकिट मिळवले आणि ते विजयी झाले. तरीही खासदार बारणे आणि आमदार थोरवे यांच्यातील कटूता मात्र काही कमी झालेली नाही. उलट ही दरी आणखी वाढत जात खासदार आणि आमदार कुठेही एका कार्यक्रमात एकत्र दिसत नाहीत.
जूनमध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यात दौरा केला, तर आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतंत्र दौरा केला होता. त्यानंतर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची खासदार बारणेंनी खालापुरात येऊन पाहणी केली. मग दोन दिवसांनी आमदार थोरवेंनी पाहणी केली. खासदारांच्या दौर्‍याच्या वेळी काही मोजकेच कार्यकर्ते असल्याचे समोर आले होते, तर आमदारांच्या दौर्‍यात तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुखांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. खोपोलीतील ढेकू औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतरही या दोघांच्यातील दुराव्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आमदार थोरवे काही पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते, तर खासदारांनी दुसर्‍या दिवशी येत घटनास्थळी पाहणी केली.
रावणाचे गर्वहरण झाले तसेच येथील परिस्थिती असून, मी मोठा की तू मोठा केले जात असल्याने कर्जत-खालापूरमध्येही एका दिवशी गर्वहरण होईल आणि तेव्हाच लोकप्रतिनिधींना जाग येईल का, असा सवाल करीत शिवसैनिक मात्र कोणाच्या बरोबर जायचे व कोणाचे बरोबर जायचे नाही, अशा संभ्रमात असल्याचे एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply