
खोपोली : प्रतिनिधी
खोपोलीत गणेशोत्सव नियमांचे पालन व प्रशासनाच्या सूचनांचा अंमल करीत मोठ्या आनंदात साजरा होत आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी सामाजिक संदेश व समाज प्रबोधन होईल या दृष्टीने मोठ्या मेहनतीने सजावट व देखावे निर्माण केले आहेत. गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनाबरोबर हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. 1926 पासूनची दीर्घ परंपरा असलेल्या वरची खोपोली बाल मित्र मंडळाने साकारलेला देखावाही या वर्षी विशेष आकर्षण ठरत आहे.
बाल मित्र गणेश उत्सव मंडळाचे हे 96वेे उत्सवी वर्ष आहे. या वर्षी मंडळाने सामाजिक संदेश व अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर देखावा साकारला आहे. पर्यावरणपूरक संदेश व प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम या देखाव्यातून मांडण्यात आले आहेत. खोपोली शहर व परिसरातील गणेश भक्तांची मोठी पसंती या देखाव्याला मिळत आहे.
शहरातील अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत अनेक घरगुती गणपतीचे देखावेही वेगवेगळ्या स्वरूपात सामाजिक संदेश व वर्तमान स्थितीवर बोट ठेवत जनजागृती करीत आहेत. यात बाल मंडळ गणेश मंडळाने साकारलेला देखावा विशेष आकर्षण बनले आहे. दररोज दर्शनासाठी येणार्या भाविकांसमोर हा देखावा व्यवस्थितपणे सादर करण्यासाठी मंडळाची विशेष टीम मेहनत घेत आहे. हा देखावा नागरिकांच्या मनाला भावत असल्याने भाविकांकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले जात आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper