नवी मुंबई : प्रतिनिधी
गोरेगाव प्रबोधन क्रीडा भवन येथे पुरुष, महिला व व्यावसायिक निमंत्रित गटाची स्पर्धा पार पडली. पुरुषांच्यात नवी मुंबईच्या विहंग क्रीडा मंडळ, महिलांमध्ये बदलापूरच्या शिवभक्त विद्या मंदिर या संघाने बाजी मारली, तर व्यवसायिक गटात पश्चिम रेल्वेने बाजी मारली.
फन लिडर्स व प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व महराष्ट्र खो-खो संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुरुष व महिला मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील पुरुषांचे 16, तर महिलांचे 8 नामवंत संघ सामील झाले होते. व्यावसायिक गटात पुरुषांचे 10 संघ सहभागी झाले होते. पुरुषांच्या गटात अंतिम सामना ठाणे, नवी मुंबईतील विहंग क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या शिरसेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबवर विजय मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर महात्मा गांधी संघाला द्वितीय क्रमांकांवर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक मुंबई शहरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर, तसेच चतुर्थ क्रमांक मुंबई उपनगरच्या प्रबोधन क्रीडा भवनने पटकावला. महिला गटात ठाणे, बदलापूरच्या शिवभक्त विद्या मंदिर संघाने ठाणे नवी मुंबईच्या रा. फ. नाईक संघावर मात करत प्रथम क्रमांक मिळवला, तर रा. फ नाईक संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक ठाणे, नवी मुंबईच्या राजर्षी शाहू महाराज संघाला, तर चतुर्थ क्रमांक मुंबईच्या शिवनेरी सेवा मंडळाला मिळाला. व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वेने प्रथम, मध्य रेल्वेने द्वितीय, मुंबई महानगरपालिकेने तृतीय, तर महाराष्ट्र विद्युत कंपनीने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.या वेळी उत्कृष्ट संरक्षक म्हणून पुरुष गटात महेश शिंदे, महिला गटात तेजश्री कोंढळकर, तर व्यावसायिक गटात अमोल जाधव याला गौरविण्यात आले. उत्कृष्ट आक्रमक म्हणून नितेश रुके, महिला गटात रेश्मा राठोड व व्यावसायिक गटात विलास करंडे याला गौरविण्यात आले. उत्कृष्ट आक्रमक म्हणून पुरुषांच्या गटात लक्ष्मण गवस महिलांमध्ये प्रियांका भोपी, तर व्यावसायिक गटात मनोज पवार याला गौरविण्यात आले. विजेत्या संघांना व खेळाडूंना रोख रक्कम व आकर्षक चषक पारितोषिक म्हणून देण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper