Breaking News

गटारात जनावरे पडण्याच्या घटना सुरूच

कर्जत पालिका प्रशासनाकडे झाकणे बसविण्याची मागणी

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत नगर परिषद हद्दीत मागील काळात रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रिटची मोठी गटारे बांधण्यात आली. यापैकी काही गटारांवर झाकणे बसविण्यात आली नसल्याने या उघड्या गटारांत जनावरे तसेच लहान मुले पडण्याच्या घटना घडत आहेत. शहरातील मुद्रे येथील गुलमोहर रेस्ट हाऊस परिसरात अशीच गटारे आहेत. या गटारांच्या दोन्ही बाजूने भरपूर गवत उगवले आहे. त्यामुळे या वाढलेल्या गवतात गटार दिसेनासे झाले आहे. त्यामुळे हे गवत चरण्यासाठी आलेल्या गायीला गटार न दिसल्याने ती चरता चरता गटारात पडली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गाय बहुधा दोन दिवसांपासून गटारात पडली असावी. गटार खोल असल्याने तसेच आजूबाजूला वाढलेल्या गवतामुळे कोणाला कळले नसावे. सुदैवाने उशिरा का होईना स्थानिकांच्या ते लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही घटना नगरसेवक नितीन सावंत यांना सांगितली. त्यांनी आपत्ती विभागाच्या कर्मचार्‍यांना बोलावून त्यांच्या आणि अन्य लोकांच्या साह्याने गटारात पडलेल्या गायीला सुखरूप बाहेर काढले. शहरात गटारात जनावरे पडण्याच्या घटना यापूर्वीही अनेक वेळा घडल्या आहेत. तेव्हा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी गटारे बंदिस्त करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानंतर काही गटारे बंदिस्त झाली. झाकणे बसविली. अद्यापही काही गटारे उघडी आहेत.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply