पोलिसांची राहणार नजर
पेण ः प्रतिनिधी
अवघ्या दोन दिवसांवर आलेली गटारी साजरी करण्यासाठी बेत आखले जाऊ लागले आहेत. याकरिता सुरक्षित मानले जाणार्या फार्महाऊसना पसंती दिली जात आहे. एकीकडे मांस, मद्यावर ताव मारण्यासाठी शौकीन उत्सुक असताना दुसरीकडे पोलिसांचीही गैरकृत्यांकडे नजर असेल. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी गटारी साजरी केली जाते. या दिवशी सर्रास मांसाहाराचा बेत आखला जातो. सोबत काही मंडळी मद्याचाही आस्वाद घेतात. यंदा गटारी बुधवारी (दि. 28) आहे. या पार्श्वभूमीवर गटारी साजरी करण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून अनेकांची पावले फार्महाऊसकडे वळू लागली आहेत. या निमित्ताने पावसाळ्यात बहरलेल्या निसर्गरम्य वातावरणात पार्टी करण्याचा विचार केला जात आहे. बहुतांश लोक श्रावण महिन्यात मांसाहार करीत नाही. या काळात शुद्ध, सात्विक शाकाहारी अन्न ग्रहण केले जाते, तर काहीजण उपवासही करतात. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जात असल्याने मांसाहार, अल्कोहोलयुक्त पेये कटाक्षाने टाळली जातात. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांसाहार खाऊन व मद्य पिऊन खवय्ये गटारी साजरी करतात. यासाठी सज्जता सुरू असून पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून सर्व घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper