महड, पाली येथे भाविकांनी साधला संकष्ट योग
मोहोपाडा, पाली : प्रतिनिधी
नववर्षाच्या प्रारंभी आलेल्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीचा योग साधत भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यामुळे अष्टविनायकांपैकी असलेले महड येथील वरदविनायकाचे आणि पालीच्या बल्लाळेश्वराचे मंदिर शनिवारी (दि. 2) भाविकांनी फुलून गेल्याचे दिसून आले.
कोरोना काळात मंदिरे बंद होती. आता राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे खुली झाल्याने भाविक दर्शनासाठी येत आहेत. गुरुवारी सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर शनिवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पाचे दर्शन घेऊन अनेकांनी नवीन वर्षाचा प्रारंभ केला. महाड येथे सकाळपासूनच गणपती संस्थान स्वागत कमानीबाहेर भक्तांची रांग लागली होती. दुपारनंतर ही रांग वाढून वळण रस्त्यापर्यंत पोहचली. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान व्यवस्थापन कमिटीने आपल्या स्तरावर सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या. मंदिर परिसर व महड फाटा येथे पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. पालीतदेखील असेच चित्र पहावयास मिळाले. दरम्यान, भाविक आल्याने स्थानिक हार, फुले, पूजेचे साहित्य विकणारे, अभिषेक करणारे यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper