देशात रोजच्या रोज मोठ्या संख्येने नव्या कोरोनाबाधितांची भर पडताना दिसत आहे. पॉझिटिव्हिटीचा दरही वाढत असला तरी तो टार्गेटेड टेस्टिंगमुळे वाढत आहे असे कदाचित म्हणता येईल. मृत्यूदर मात्र कमी होत असल्याने परिस्थिती काही प्रमाणात निश्चितपणे नियंत्रणात आहे हेही स्पष्ट होते, परंतु औषधांचा बेसुमार काळाबाजार व अत्यवस्थ रुग्णांना आजही वेळेत उपचार उपलब्ध होण्याविषयी न वाटणारी खात्री यामुळे कोरोनाची दहशत कायम आहे.भारतातील कोरोना केसेसची संख्या लवकरच नऊ लाखांचा टप्पा गाठेल असे दिसत आहे. तूर्तास कोविड-19मधून बरे झालेल्यांची संख्या साडेपाच लाखांच्या आसपास आहे, तर या साथीत दगावलेल्यांची संख्या 23 हजारांच्या पुढे गेली आहे. आजही रोजच्या रोज मोठ्या संख्येने नव्या रुग्णांची भर पडत असली तरी मृत्यूदर सातत्याने घटत असल्याने आपल्याकडील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे असे म्हणायला निश्चितच वाव आहे. केल्या जाणार्या कोरोना चाचण्यांमधून अधिकाधिक रुग्ण पॉझिटिव्ह निघत असल्याने या घातक विषाणूची साथ वेगाने फैलावत असल्याचे चित्र निर्माण होते व कदाचित साथ खरोखरच वेगाने पसरत असावीही, परंतु विश्लेषक याकडेही लक्ष वेधत आहेत की आपल्याकडील टेस्टिंग हे खूपच टार्गेटेड आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या अगदी निकटतम संपर्कातील व लक्षणे असणार्यांचीच कोरोना चाचणी सध्या केली जात आहे. परिणामी या गटातून चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वाढते व त्यामुळेच आपला पॉझिटिव्हिटी दर सातत्याने वाढताना दिसत आहे. मे महिन्याच्या प्रारंभी भारतातील पॉझिटिव्हिटी दर 4.14 टक्के इतका होता. हळूहळू वाढत तो आता 7.44 टक्क्यांवर पोहचला आहे. आकडेवारीचे विश्लेषण करायचे झाल्यास मे महिन्यात प्रति 10 हजार व्यक्तींमधून 414 जणांची चाचणी पॉझिटिव्ह येत होती, तर तीच आता 744 जणांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. या आकडेवारीपेक्षाही आपल्या परिचयाच्या किंवा ज्ञात वर्तुळातील अधिक लोकांच्या चाचण्या आता पॉझिटिव्ह येत असल्याचे आपल्याही सहजपणे लक्षात येत आहे. तसेच यापैकी बहुतेक व्यक्ती बर्या होऊन घरी परतत असल्याचेही दिसते. आकडेवारी आणि सभोवतालची प्रत्यक्षातील परिस्थिती या दोन्हींतून आपल्या देशात या महामारीचे नियंत्रण अपेक्षेपेक्षा चांगल्या तर्हेने करण्यात आले आहे असे सरसकट म्हणता आले असते, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रात मात्र वैद्यकीय व्यवस्थेतील गलथानपणामुळे जनतेमध्ये कोरोनाविषयीची दहशत किंचितही कमी झालेली नाही. धारावीसारख्या प्रचंड दाटीवाटीच्या झोपडपट्टीतील कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेताच त्याचे श्रेय लाटण्यासाठी झपाट्याने पुढे सरसावलेल्या आघाडी सरकारने राज्यभरातील एकंदर वैद्यकीय दुरवस्थेचीही जबाबदारी घेण्यास पुढे यावे. आम्ही अमुक इतक्या बेडच्या कोविड सेंटरची उभारणी केली असे म्हणत स्वत:तीच पाठ थोपटून घेणार्या या सरकारकडे आजही अत्यवस्थ रुग्णांना तातडीने आयसीयू बेड का मिळत नाही याचे उत्तर आहे का? रेमेडेसिवीर आणि टोकलिझुमॅब या औषधांच्या काळ्या बाजाराने कहर केलेला असताना सरकारी यंत्रणा त्याकडे डोळेझाक का करीत आहे याचेही उत्तर सरकारमधील वाचाळवीरांनी द्यावे. प्रकृती गंभीर असणार्या रुग्णांनाच फक्त या औषधांची गरज असताना त्याची मागणी वाढून तुटवडा निर्माण होतोच कसा? अनेक दिवस हे गैरप्रकार सुरू असूनही एखाददोन औषध दुकानांमध्ये कॅमेर्याच्या ताफ्यासह फेरफटका मारण्यापलीकडे सरकारकडून कोणतीही कारवाई न झाल्याने काळा बाजार करणार्यांचे फावले आहे. या सार्या गैरप्रकारांमुळेच कोरोना हा महामारीबरोबरच काही निवडक लोकांकरिता बक्कळ कमाई करण्याचा धंदाही होऊन बसल्याची भावना जनतेमध्ये वाढत आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper