Breaking News

गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले, तर मोठी शक्ती निर्माण होऊ शकते. त्यानुसार एकीचे बळ, सहकाराची भावना, श्रमाला प्रतिष्ठा आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांनी प्रेरित होणारी भावी पिढी घडण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138वा जयंती सोहळा व त्या निमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कै.ज.आ. भगत पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 26) उत्साहात झाला. त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून असलेल्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाने संघर्षमय आणि प्रतिकूल परिस्थितीतून विकास साधला आहे. आता आपल्याला सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. संस्थेचा कोणताही उपक्रम आपण आपल्या विद्यालयात प्रथम राबवतो. येणार्‍या काळात रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य संपादन करावे, असेही ते म्हणाले.
प्रमुख वक्ते ’हेडाम’ या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक नागू विरकर यांनी कर्मवीर अण्णांच्या संस्थेत आपण शिकल्याचा अभिमान व्यक्त
करून आयुष्यातील अत्यंत संघर्षमय आणि खडतर जीवन प्रवासाचे अनुभव कथन केले.
विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय.टी. देशमुख, महेंद्र घरत यांनीही विचार मांडले. घरत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाचा गुण आपण घेतल्याचे सांगून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकासाठी पाच लाख रुपये विद्यालयास देण्याचे जाहीर केले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेकडे ठेवलेल्या 10 लाख 25 हजार रुपयांच्या कायम ठेवीवरील व्याजातून आलेल्या रकमेतून गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके वितरीत करण्यात आली. विद्यालयाच्या माजी उपशिक्षिका द्रौपदी रमेश वर्तक यांनी विविध शिष्यवृत्ती परीक्षांमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे पारितोषिके प्रदान केली, तर लायन्स क्लबच्या वतीने दीपा मोर्या यांनीही दहावीत प्रथम विद्यार्थ्यास एक हजार रुपयांचे पारितोषिक दिले.
रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ.शिवलिंग मेनकुदळे, ऑडिट विभागाचे सहसचिव डॉ.राजेंद्र मोरे आणि माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार या तिन्ही सहसचिवांनी या वेळी विद्यालयास भेट दिली. त्यांचे सन्मानचिन्ह व रोप भेट देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, भाऊशेठ पाटील, वसंतशेठ पाटील, रामदास ठाकूर, जितेंद्र म्हात्रे, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, सागर ठाकूर, सी.एल. ठाकूर, सुधीर ठाकूर, राजेंद्र देशमुख, रघुनाथ देशमुख, भाऊ भोईर, काशिनाथ पाटील, हेमंत ठाकूर, भार्गव ठाकूर, कुंदन मोकल, अ‍ॅड.योगिता भगत, मीनाक्षी पाटील, माजी प्राचार्य साधना डोईफोडे, वैभव घरत, अंकुश ठाकूर, पी.के. ठाकूर, राम मोकल, संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, लाईफ मेंबर प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, लाईफ वर्कर देवेंद्र म्हात्रे, एमएनएम विद्यालयाच्या प्राचार्य सायली वडवलकर, प्रणिता गोळे, कांबळे गुरुजी, प्राचार्य तथा संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे, पर्यवेक्षिका शशिकला पाटील, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख संजय उगले यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मवीर जयंती वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण भाषणाने विद्यार्थी प्रेक्षकांसह मान्यवरांचीही वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन ज्योत्स्ना ठाकूर यांनी, सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक सागर रंधवे व दर्शना माळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार चेअरमन अरुणशेठ भगत यांनी मानले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply