गव्हाण ः वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने नॉलेज ऑन व्हील्स अर्थात फिरती प्रयोगशाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
पनवेल येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने या फिरत्या प्रयोगशाळेच्या विज्ञान प्रशिक्षिका जयश्री सानप व सहाय्यक गणेश संसारे यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती दिली व उपलब्ध साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यार्थ्यांनीही या प्रात्यक्षिकांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी प्रयोग करून दाखवण्यापूर्वी काही प्रश्नावली देऊन त्याची माहिती घेतली. या फिरत्या प्रयोगशाळेचे स्वागत विद्यालयांमध्ये विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय सदस्य प्रमोद कोळी व रविंद्र भोईर आणि विद्यार्थ्यांनी केले.
विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी आणि वर्ग उपलब्ध करून देऊन शाळेने विशेष सहकार्य केल्याची प्रतिक्रिया सेवा सहयोग फाउंडेशनच्या या फिरत्या प्रयोगशाळेच्या विज्ञान प्रशिक्षिका जयश्री सानप यांनी व्यक्त केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper