Breaking News

गाफीलपणा नकोच!

भारतामध्ये गेला जवळपास दीड महिन्यांहून अधिक काळ कोरोनाचा आलेख खाली घसरताना दिसत होता. परंतु आता दिवाळीनंतर कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करताच नव्या केसेसमध्ये थेट 32 टक्क्यांची एक दिवसीय वाढ दिसून आली. दिवाळीच्या काळात चाचण्या आठ लाखांपर्यंत खाली घसरल्या होत्या, त्या मंगळवारी 9.3 लाखांवर आल्या. या वाढीबरोबरच पॉझिटिव्हिटी रेट 4.1वर गेलेला दिसून आला. राजधानी दिल्लीत सोमवारी 3797 नव्या केसेस नोंदल्या गेल्या होत्या, तर मंगळवारी हा आकडा 6396वर गेला. तेथील केजरीवाल सरकारने ताबडतोबीने लग्नसमारंभातील उपस्थिती 200 वरून 50 माणसांवर आणण्याचे ठरवले आहे. दिल्लीतील हे चित्र बरेच बोलके आहे.

कोरोना विषाणू भूतलावर अवतरल्याची पहिलीवहिली नोंद झाली, तो दिवस होता 17 नोव्हेंबर 2019. त्या अर्थाने मंगळवारचा दिवस हा कोरोनाचा वाढदिवस म्हणता येईल. कोविड-19ची ही पहिलीवहिली केस चीनच्या हुबेई प्रांतात नोंदली गेली होती. त्यानंतर 8 डिसेंबरला चिनी अधिकार्‍यांना दुसरी केस वुहानमध्ये सापडली. तेव्हा हा न्यूमोनियासदृश आजार म्हणजे नेमके काय हे डॉक्टरांना देखील कळले नव्हते. 3 जानेवारी 2020 रोजी चीनने या अज्ञात विषाणूच्या फैलावाची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला कळवली आणि 7 जानेवारीला त्याचे नॉव्हेल कोरोना व्हायरस असे नामकरण झाले. जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत अन्य देशांमधून याच स्वरुपाच्या केसेस आढळू लागल्या. यात पूर्व आशियाई देशांचा समावेश होता तर 21 जानेवारी रोजी अमेरिकेत वॉशिंग्टन येथे कोरोनाची पहिली केस आढळली. एव्हाना चीनने प्रवासावर निर्बंध लादणे आणि क्वारंटाइनला सुरूवात केली होती. 30 जानेवारीला भारतात कोरोनाची पहिली केस नोंदली गेली. त्यानंतरचा सगळा इतिहास आपण सगळेच जगलो आहोत. जवळपास वर्ष होत आले असले आणि कसोशीने उपाययोजना राबविल्या असल्या तरी जगभरातील अनेक देश आजही कोरोनाच्या तावडीतून सुटू शकलेले नाहीत. गाफीलपणा दाखवल्यास कुठल्याही ठिकाणी सध्या दिल्लीत दिसते आहे तशी परिस्थिती उद्भवू शकते. संबंधित तज्ज्ञ पुन्हा पुन्हा याकडे लक्ष वेधत आहेत. पण सर्वसामान्य जणु ऐकण्याच्या पलीकडे गेल्यासारखे वागत आहेत. आपण आणि आपले परिचित यांना कोरोनाची लागण होऊच शकत नाही अशा समजुतीतून जणु बहुतेकांचा वावर पूर्ववत होऊ लागला आहे. मुंबईतील केसेसचा आकडा सोमवारी 409 इतका होता, तर 12 मृत्यूंची नोंद झाली. राज्यभरात याच दिवशी 2535 नव्या केसेस नोंदल्या गेल्या. मागील पाच महिन्यांच्या काळात प्रथमच इतक्या कमी दैनंदिन केसेसची नोंद राज्याने अनुभवली. केसेसचा आलेख असाच उतरता ठेवण्यासाठी दक्षता घेत राहण्याला पर्याय नाही. दरम्यान, देशातील पहिली देशी बनावटीची लस कोवॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. निरनिराळ्या लसींसंदर्भात 90 ते 95 टक्के प्रभावी असल्याच्या बातम्या येत आहेत. भारतासाठी नेमकी कोणती लस अधिक प्रभावी ठरू शकेल आणि लसीकरण नेमके केव्हा प्रत्यक्षात येऊ शकेल याचीही चर्चा सुरू झाली आहे. मागणी लक्षात घेता बनावट लसी ऑनलाइन उपलब्ध होत आहेत, असा इशाराही अमेरिकी औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. भारतासमोर लसींचा साठा व वितरण यांच्यासंदर्भातील काही आव्हाने असून त्यासंदर्भात उपाययोजनांची आखणी सुरू आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply