पाली : प्रतिनिधी
खराब हवामान व अवकाळी पावसामुळे यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. आवक कमी झाल्याने हापूस आंब्याचे दर हंगाम सरत चालला असला तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड होऊन बसले असून बाजारात गावठी आंबे दाखल झाल्याने खवय्ये त्यांची खरेदी करीत आहेत. किंमत कमी व नैसर्गिक पद्धतीने पिकलेले हे गावठी आंबे खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
यंदा जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. शिवाय रत्नागिरी व देवगडचा हापूसदेखील थेट वाशी मार्केटला व मोठ्या बाजारात जात आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात हापूस कमी दिसत आहे, परंतु सध्या अनेक आदिवासी जंगलातील किंवा परसबागेत लावलेल्या झाडावरील आंबे बाजारात टोपल्यांमध्ये घेऊन विक्रीसाठी येत आहेत. विविध फार्महाऊसच्या बागांमधील आंबेही विक्रीसाठी येत आहेत. या जोडीलाच कर्नाटकी, पायरी, तोतापुरी, नीलम, गावठी (बिटके) आदी विविध प्रजातींचे आंबेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. खवय्ये ते खरेदी करताना दिसत आहेत.
हापूसच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यात बाजारात हापूस फारसा उपलब्धदेखील नाही. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध होत असलेले गावठी आंबे खरेदी करून खात आहोत, अशी प्रतिक्रिया खरेदीदार नागरिकांनी दिली.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper