नव्या दमाचे गुंतवणूकदार सध्याच्या अस्थिर वातावरणात शेअर बाजारात येत आहेत, त्यांचे स्वागतच आहे. पण अशावेळी दीर्घकालीन गुंतवणूक नव्हे तर मुद्दल सुरक्षित ठेवत गुंतवणूक करायची असते, याचा विसर पडता कामा नये.
नुकताच एका नामवंत हॉस्पिटलमधील प्रख्यात डॉक्टरचा व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यामध्ये ते अगदी सोप्या भाषेत परंतु अत्यंत आत्मविश्वासानं कोरोनाबद्दलचे गैरसमज घालवताना त्याबद्दलची भिती घालवताना दिसत होते. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य वाटला. ज्याप्रमाणं ते डॉक्टर जरी कोरोनाचा प्रादूर्भाव झाला तरी घाबरू नका हे ठामपणे सांगत होते अगदी त्याचप्रमाणं आज मला देखील गुंतवणूकदारांना काही गोष्टी सांगायच्या आहेत, काही गोष्टींबद्दल सावध करायचं आहे.
मार्चमध्ये कोसळलेल्या शेअर बाजाराचा लाभ उठवण्यासाठी कोरोनामुळे घरातच अधिक काळ थांबण्याची वेळ आल्यामुळे भारतातील लाखो किरकोळ गुंतवणूकदारांनी प्रथमच शेअर मार्केटमध्ये एंट्री घेतली. व्याजदराच्या घसरणीमुळेही काही गुंतवणूकदार इक्विटीकडे वळले. लॉकडाऊन दरम्यान घरात आरामात बसून कमाईचा नवीन मार्ग सापडल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला आहे. एका आकडेवारीनुसार, मागील चार महिन्यांत सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त डीमॅट अकाउंट (ज्याद्वारे शेअर्सची खरेदी विक्री करावी लागते ते खातं) उघडले गेले आणि त्यातील निम्म्यापेक्षा जास्त खाती ही प्रथमच उघडली गेली.
एका मोठ्या ब्रोकिंग फर्मच्या संस्थापकाच्या दाव्यानुसार अशा नवीन उघडलेल्या खातेधारकांचं सरासरी वयोमान आहे वयवर्षे 30 आणि प्रतिखाती सरासरी गुंतवणूक आहे रुपये 80,000. म्हणजे आपण विचार करू शकतो की किती पैसा आज शेअरमार्केटमध्ये थेट प्रकारे आला आहे. अशा नव्यानं येणार्या नव्या दमाच्या गुंतवणूकदारांचं स्वागतच आहे. परंतु आजची परिस्थिती पाहता ही परिस्थिती नक्कीच दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची योग्य वेळ नाही तर उत्तम कंपन्या योग्य भावात घेऊन त्यातून नफा कमावून मुद्दल सुरक्षित ठेवणं, ही सध्या काळाची गरज आहे.अनेकदा आपण काही कंपन्यांचे शेअर्स तेजीमध्ये खरेदी करतो आणि नंतर त्या शेअरचे भाव कमी होऊ लागतात आणि आपण तसे शेअर्स नुकसानीमध्ये न विकता वर्षोनुवर्ष तसेच ठेऊन देतो आणि अशाप्रकारे आपसूकच आपली दीर्घकालीन गुंतवणूक होऊन जाते. उदा. येस बँक (मागील दोन वर्षांत 400 वरून सध्या रुपये 20), आयडिया (मागील पाच वर्षांत 200 वरून सध्या रुपये9), आरकॉम (उच्चांक 844 वरून सध्या रुपये अडीच), इत्यादी. पण याउलट चांगल्या कंपन्यांचे शेअर्स नफा असूनसुद्धा न विकता त्या कंपनीची भविष्यातील व्यवसायवृद्धी लक्षात घेऊन दीर्घावधीसाठी ठेऊन देतो, त्यास खर्या अर्थानं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात.आणि जी आपणास संपत्तीनिर्मितीसाठी उपयोगात येते. उदा. इन्फोसिस, विप्रो, एचडीएफसी बँक, रिलायन्स.
नव्या गुंतवणूकदारांसाठी काही मूलमंत्र :
1) आपली सर्वांच्या सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी न करता निरनिराळ्या पर्यायात म्हणजे मुदतठेव, डेब्ट, शेअर्स, स्थावर मालमत्ता, सोनं, इ. स्वरूपात असावी. प्रत्येकाची आपली अशी कांही खास वैशिष्ट्यं आहेत, त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
2) शेअरबाजार म्हणजे काही जादूची छडी नव्हे आणि म्हणूनच अव्वाच्या सव्वा अपेक्षा ठेवून बाजारात गुंतवणूक करू नये.
3) गुंतवली जाणारी रक्कम दीर्घ कालावधीसाठी अडकून राहू शकते अथवा अनर्थ घडल्यास संपूर्णपणे बुडू देखील शकते हे गृहीत धरावं. वर दिलेली उदाहरणं नक्कीच बोलकी आहेत.
4) शेअरबाजारात करावयाची गुंतवणूक ही वेगळी असावी म्हणजे, काही उद्दिष्टांसाठी निराळी ठेवलेली रक्कम शेअरबाजारात कधीही गुंतवू नये कारण शेअर्सचे भाव वाढणं आपल्या हातात नसतं आणि तसंच गुंतवलेल्या रकमेत नुकसान देखील सोसावं लागतं, त्यामुळं नजीकच्या बाबींसाठी (उदा. दोन-सहा महिन्यानंतर भरावयास लागणारी मुलांच्या शाळेची फी, मोठ्या खर्चासाठी म्हणजे लग्नकार्य, घर खरेदी, डागडुजी इत्यादी.) साठवलेले पैसे बाजारात कधीही गुंतवू नयेत.
5) कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्याआधी कंपनीच्या व्यवसायाचा अभ्यास करावा, म्हणजे कंपनीचं व्यवस्थापन, कंपनीवर असलेली कर्ज, नफ्याचा अंदाज, कंपनीची उत्पादनं, त्यांचा बाजारातील दर्जा, बाजारपेठेतील मागणी व हिस्सा, कंपनीच्या उत्पादनांची दीर्घकालीनता, इत्यादी.
6) जरी आपण निवडलेली कंपनी योग्य असेल तरी जागतिक घडामोडी, नैसर्गिक आपत्ती, देशाची अर्थव्यवस्था, आर्थिक प्रगती, त्या कंपनीच्या क्षेत्रांवर परिणाम करणार्या घडामोडी (उदा. साखरेच्या निर्यातीवर बंदी त्या कंपन्यांच्या शेअरभावांवर परिणाम करू शकते) अशा अनेक गोष्टी तपासाव्या लागून निर्णय घ्यावे लागतात अथवा घेतलेले निर्णय बदलावे लागतात.
7) कंपनीचा अभ्यास करून गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी आपण कंपन्यांचे वार्षिक अहवाल तपासतो. आपल्या खरेदी भावापेक्षा वरील भावात शेअर्सची विक्री केल्यास नफा कमावता येतो. ज्याप्रमाणं आपण घेतलेला शेअर कोठे विकायचा हे ठरवलेलं असतं, त्याचप्रमाणं आपलं उद्दिष्ट साध्य न झाल्यास व शेअरची किंमत घसरू लागल्यास वेळप्रसंगी नुकसानीत शेअर विकण्याचा भाव देखील अगोदर ठरवलेला असला पाहिजे आणि त्यासाठी टेक्निकल ऍनालिसिसची आपल्याला मदत घ्यावी लागते.
अशा काही सोप्या गोष्टी पाळल्यास शेअर बाजार हा सुखावहच वाटेल याबद्दल दुमत नाहीच. शेअर बाजारात आणखी कोणती काळजी घ्यावी आणि परतावा कसा मिळवावा, हे आपण पुढील भागात पाहूच.
छोट्या गुंतवणूकदारांचा हातभार
मागील आठवड्यात चढ-उतार अनुभवून बाजारानं आठवड्याचा शेवट मात्र गोड केला. बीएसई सेन्सेक्सनं 426 अंशांची तर राष्ट्रीय शेअरबाजाराच्या निफ्टी निर्देशांकानं 133.65 अंशांची वाढ नोंदवली. सेन्सेक्स 37 हजारांवर स्वार झाला तर निफ्टिनं 10900 ही पातळी ओलांडली. जरी मागील आठवड्यातील वाढ ही किरकोळ असली तरी आठवड्याचा पहिला व शेवटचा दिवस सोडता इतर तीन दिवस बाजार काहीसा थंडावलेला होता. परंतु शेवटच्या दिवशी परकीय गुंतवणूकदारांनी केलेली 700 कोटी रुपयांची खरेदी निर्णायक ठरली. गेल्या आठवड्यात निफ्टी 50 मधील भारत पेट्रोलियमचे शेअर्स सर्वाधिक 18% वाढले तर येस बँकेचे शेअर्स 22.5 % कोसळले. मागील काही दिवस मोठे गुंतवणूकदार सपाट्यानं विक्री करीत असले तरी बाजारात येणार्या किरकोळ गुंतवणूकदारांमार्फत येणारा पैसा बाजारास तेजीत हातभार लावत आहे. येत्या आठवड्यात पुढील उद्दिष्ट 11000-11200 असू शकेल तर खालील बाजूस 10750 आणि 10550 ह्या आधार पातळ्या संभवतात. जसजसा बाजार उर्ध्व दिशेस मार्गक्रमण करेल तसतशी बाजारातील जोखीम व बाजारातील अस्थिरता वाढेल, याची नोंद गुंतवणूकदारांनी घ्यावी.
सुपरशेअर : इन्फोसिस
मागील आठवड्यात सुमारे 22 टक्के उसळी मारलेला शेअर होता इन्फोसिस.
16 जुलै रोजी इन्फोसिसनं आपल्या 20-21 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जरी फक्त नफा दीड टक्क्यांनी घसरून 4272 कोटी रुपये, तर एकूण उत्पन्न 23665 कोटी रुपये असलं तरी तरी बाजारातील तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा (अनुक्रमे 3941 कोटी व 22957 कोटी) आकडे उजवे आल्यानं इन्फोसिसचा शेअर मागील गुरुवारी तब्बल दहा टक्क्यांपेक्षा जास्त वधारला. साडेसहा टक्क्यांनी सुधारलेली मार्जिन्स देखील या तेजीस हातभार लावायला पूरक ठरली.
फेब्रुवारी 1993मध्ये आलेल्या या कंपनीच्या आयपीओनं आतापर्यंत सर्वच भागधारकांना मालामाल केलेलं आहे. 1993 मध्ये घेतलेल्या शंभर शेअर्सचे सर्व बोनस धरून आज 102400 शेअर्स झालेलं आहेत, म्हणजेच 1993 मधील साडेनऊ हजारांची गुंतवणूक आज नऊ कोटी 22 लाखांची संपत्ती झालीय, ज्यामध्ये लाभांशाची रक्कम गृहीत धरलेली नाहीय. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना भरभरून देत आलेल्या इन्फोसिसचा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं हे निश्चितच हिताचं, काय पटतंय का?
– प्रसाद ल. भावे.
sharpadvisers@gmail.com
RamPrahar – The Panvel Daily Paper