
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे गोकुळाष्टमीनिमित्त किल्ले गावठाण बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या 13व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्री गोवर्धनी मातेची आराधना तसेच नवचंडी होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते. या होमहवन व पूजा बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडली.
कोरोनासारखा महाभयंकर रोगाचा नायनाट व्हावा, कोरोना महामारीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत व्हावे व ज्या आर्थिक संकटाना नागरिक सामोरे जात आहेत ते संकट दूर होऊन सर्व काही पूर्व पदावर येऊन सुख, शांती आणि समृद्ध जीवन सर्वांना लाभो अशी प्रार्थना आज गोवर्धनी मातेला नवचंडी होमानिमित्त केली असल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले. नवी मुंबईतील सुमारे दीडशे वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणजे श्री गोवर्धनी मातेचे मंदिर अशी आख्यायिका आहे. श्री गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई म्हणून श्री गोवर्धनी माता प्रसिद्ध आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री गोवर्धनी आईची जनमानसात ख्याती आहे. श्री गोवर्धनी मातेचे मंदिर हे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार 13 वर्षांपूर्वी आमदार म्हात्रे यांच्या हस्ते गोकुळाष्टमीच्या दिवशी करण्यात आला होता. दरवर्षी गोकुळ अष्टमीच्या दिवशी यथोचित पूजा अर्चा व उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव साधेपणाने, सामाजिक अंतर ठेवून केवळ पुजार्यांसमवेत साजरा केला गेला.
RamPrahar – The Panvel Daily Paper