Breaking News

गोष्ट न संपणारी

आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील सर्वात जास्त महत्वाची गोष्ट, आवडत्या कलाकारावर त्याच्या चाहत्यांचे भरभरून प्रेम. राजेश खन्नावर तर समाजातील वरच्या स्तरापासून खालच्या माणसापर्यंत अनेकांनी बेहद्द प्रेम केले.
एक वेगळी गोष्ट सांगतो,आजही मी वांद्र्याच्या कार्टर रोडवरुन जातो तेव्हा माझे लक्ष हटकून राजेश खन्नाच्या बहुचर्चित अशा आशीर्वाद बंगल्याकडे जाते आणि आज त्या बंगल्याच्या कोणत्याच खाणाखुणा तेथे शिल्लक नसून एक उत्तुंग इमारत उभी राहिल्याचे दिसते तेव्हा वाईट वाटते. एका कोपर्यात कुठे तरी आशीर्वाद असे म्हटलयं. राजेश खन्नाची वैभवशाली बहुस्तरीय वाटचाल या इमारतीपेक्षाही खूपच मोठी आहे.
या बंगल्याबाबतची माझी आणखीन एक विशेष आठवण सांगतो. तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही. साधारणपणे 2012 च्या सुरुवातीची गोष्ट. तो अनुभव फारच वेगळा होता. राजेश खन्नाच्या वांद्र्याच्या कार्टर रोडवरील ’आशीर्वाद’ बंगल्यासमोर ये असा एका पत्रकार मित्राचा मेसेज आला आणि कुतूहल जागं झालं. आता यावेळी तेथे काय असणार? राजेश खन्नाच्या चलतीच्या काळात मी त्याचा निस्सीम भक्त म्हणून कॉलेजच्या काळात मित्रांसोबत या बंगल्याबाहेर तासन तास उभा असे. माझ्यासारखे आणखीन काही त्याचे फॅन्सही असत आणि तो वेगळ्या शैलीचा आकर्षक बंगला पाहून परतत असे. माझे मन जुन्या आठवणीत गेले. पण आज काय असेल? तेथे आजही तशीच गर्दी होती, काही मिडियावाले होते, आमच्या सगळ्यांच्या नजरा बंगल्यावर लागल्या होत्या आणि अशातच अक्षयकुमार राजेश खन्नाला घेऊन सामोरा आला. काळा गॉगल लावलेला, डोळे खोलात गेलेला, नजर हरवलेली, गाल खूप आत गेलेला, उसने हास्य असलेला राजेश खन्ना असू शकतो हे पटत नव्हते, पण तेच ’दिसत ’ होते. डोळ्यात अश्रू यावेत असे त्याचे दर्शन होत होते. त्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या डिंपलचा चेहराही हरवल्यासारखा होता. हे सगळे काय होते? तर राजेश खन्नामधल्या ’सुपर स्टार ’ला दाखवून द्यायचे होते की ’आजही त्याची जबरदस्त क्रेझ आहे’….. हा एक ’शो ’ होता. या हिंदी चित्रपटसृष्टीनुसार हे घडत होते.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात राजेश खन्नाचा स्टारडम हा शब्दांत न मावणारा आहे. एक वेबसिरिज होईल अशीच त्याची बहुस्तरीय, बहुचर्चित, बहुरंगी, बहुढंगी, नाट्यमय अशी कलरफुल वाटचाल आहे. आमच्या गिरगावातील ठाकूरव्दार नाक्यावरच्या सरस्वती भुवनच्या तिसरा मजल्यावर राहणारा हा जतिन (त्याचे मूळ नाव) हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉपच्या निर्मात्यांची युनायटेड प्रोड्युसर ही संस्था आणि फिल्म फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ’टॅलेंट हंट ’ स्पर्धेत त्याने बाजी मारली आणि युनायटेड प्रोड्युसर्सनी त्याला आपल्या चित्रपटासाठी ’साईन ’ केले. (सुभाष घई आणि धीरजकुमारही नंतरच्या स्थानावर निवडले गेले). सर्वप्रथम जी. पी. सिप्पी यांनी ’राज ’साठी (दिग्दर्शक भास्कर दवे) साईन केले (’राज’मध्ये अगोदर असलेल्या हीरोने चित्रपट सोडल्यावर सुभाष घईकडे हा चित्रपट आला. पण तोपर्यंत राजेश खन्नाची वर्णी लागली. बबिताचाही हा पहिलाच चित्रपट) पण चेतन आनंद दिग्दर्शित ’आखरी खत ’ (1966) अगोदर झळकला आणि त्यावर्षी भारताची ऑस्करसाठीची प्रवेशिका म्हणून निवडला गेला. औरत, नौनिहाल, बहारो के सपने असे एकेक करत त्याचे चित्रपट प्रदर्शित होत होते, नासिर हुसेन यांनीही ’बहारो के सपने’साठी सुरुवातीला सुभाष घईलाच विचारले, पण तेथेही राजेश खन्ना आला. अशातच शक्ती सामंता दिग्दर्शित ’आराधना ’ (1969) आला आणि राजेश खन्ना पर्व सुरु झाले…. चित्रपटातील मेरे सपनो की रानी कब आयेगी तू , रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना (गीतकार आनंद बक्षी, संगीत सचिन देव बर्मन) वगैरे गाणी आजही लोकप्रिय आहेत. ’आराधना’मध्ये मध्यंतरनंतरच्या पायलट राजेश खन्नाच्या मित्राच्या भूमिकेत सुभाष घई आहे. रॉक्सीमध्ये ’आराधना ’ तुफान गर्दीत सुरु असतानाच राजेश खन्नाने गिरगाव सोडले आणि तो आशीर्वाद बंगल्यात राह्यला गेला. तो बंगला त्याने राजेन्द्रकुमारकडून विकत घेतला आणि त्याने बंगल्याचे ’डिंपल ’ हे नाव बदलून ’आशीर्वाद ’ केले आणि काही वर्षातच डिंपल कपाडिया त्याची पत्नी बनून या बंगल्यात राह्यला आली. या बंगल्यासाठी निर्माते बी. आर. चोप्रा यांनी त्याला चांगल्या मानधनात आपल्या बॅनरच्या ’इत्तेफाक’साठी साईन केले आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांनी परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत सेट लावून अवघ्या काही दिवसात चित्रपट पूर्णही केला…..आजही ’इत्तेफाक ’ तसाच रहस्यरंजक अनुभव देतो. राजेश खन्नाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटातील हा एक आहे. राजेश खन्नाच्या यशात त्याच्या चित्रपटाच्या कथा आणि गीत संगीत यांचा विशेष वाटा आहे. आणि त्यातील राजेश खन्नाचा अभिनय रसिकांना विलक्षण भावला.
दो रास्ते, डोली, अमर प्रेम, बंधन, अपना देश, मर्यादा, आनंद, सफर, कटी पतंग, हाथी मेरे साथी, द ट्रेन, आन मिलो सजना, अंदाज, दुश्मन, अनुराग दाग……. राजेश खन्नाचा चित्रपट फक्त आणि फक्त खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादण्यासाठी रिलीज होई. रसिक त्याचे चित्रपट पुन्हा पुन्हा एन्जॉय करीत. त्यातच त्याने दिग्दर्शक शक्ती सामंता यांच्यासोबत ’शक्तीराज’ ही वितरण संस्था सुरु केली….वय वर्षे सात ते सत्तर असे त्याचे चाहते होते. काही तर वेडापिसे झाले होते. काही जणांनी तर ’आपण राजेश खन्नासारखे दिसावे’ असे रुपडं आत्मसात केले होते. आमच्या गिरगावात चक्क चारजण ’डिट्टो ’ राजेश खन्ना होते. क्रेझी होते. त्याचा गुरुशर्ट फेमस झाला, तो ज्या पध्दतीचे शर्ट परिधान करे लगोलग तशी शर्ट परिधान करण्याची फॅशन येई. युवतींमध्ये त्याची ’हिस्टेरिया ’ म्हणजे वेड लागावे अशी क्रेझ निर्माण झाली. आशीर्वाद बंगल्याबाहेर त्यांची गर्दी असे, कधी बरे त्याची गाडी बाहेर पडतेय आणि उडणारी धूळ आपल्या कपाळी लावतोय असे होई, काही युवती आपल्या रक्ताने त्याला पत्र लिहून आपले प्रेम व्यक्त करीत, त्याला ढिगाने पत्र येत, स्टुडिओत त्याची गाडी शिरताच अनेक युवती त्याच्या गाडीचे चुंबन घेत….. क्रेझ, क्रेझ, क्रेझ म्हणजे काय असते ते हे असते. एक कलरफुल स्वप्न वाटावे असे वातावरण होते. फिल्म इंडस्ट्री त्याला ’काका ’ नावाने हाक मारत. पंजाबी समाजात मुलासारखा गोंडस चेहरा असलेल्या व्यक्तीला काके म्हणतात. राजेश खन्नालाही काके म्हणत, त्यावरुन काका झाला. आणि गाजला. बीबीसीने राजेश खन्नाच्या क्रेझवर एक माहितीपटही तेव्हा निर्माण केला असे त्याचे वलय होते. त्यात जे. ओम प्रकाश दिग्दर्शित ’आप की कसम ’चे काश्मीरमधील शूटिंग तसेच यश चोप्रा दिग्दर्शित ’दाग’चा मिनर्व्हा थिएटरमधील ग्लॅमरस प्रीमियर
पाह्यला मिळतोय.
1972 पर्यंत हा झंझावात राहिला आणि प्रकाश मेहरा दिग्दर्शित ’जंजीर’ (मे 1973) आणि ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’नमक हराम’ (1973) प्रदर्शित झाले आणि ’अमिताभ बच्चन नावाचा अ‍ॅन्ग्री यंग मॅन ’रसिकांना आवडला. ’नमक हराम ’च्या वेळी राजेश खन्ना आणि अमिताभ यांच्यात सरस कोण यावर दोघांचेही चाहते हमरीतुमरीवर येऊन वाद घालत. मिडियातूनही त्याची भारी चर्चा आणि तुलना रंगे.
दरम्यान, ओळीने जसे त्याचे चित्रपट धो धो चालले, तसेच तशाच ओळीने फ्लॉपही होऊ लागले. मेहबूब की मेहंदी, त्याग, मलिक, राजा रानी, मेरे जीवन साथी, हमशकल, बावर्ची, शहजादा वगैरे बरेच ..हा आश्चर्याचा मोठा धक्काच. होत्याचे अचानक नव्हते झाले. हा कौल प्रेक्षकांचा होता. त्यांना हे चित्रपट आवडले नाहीत.
1974 साली ’रोटी ’, ’अजनबी ’, ’प्रेम नगर ’ ’आप की कसम ’च्या ज्युबिली हिटने राजेश खन्नाची वाटचाल व्यवस्थित सुरु होती. पण 1975 च्या जानेवारीत यश चोप्रा दिग्दर्शित ’दीवार ’ पडद्यावर आला तोच अमिताभ बच्चनचे दीर्घकालीन वादळ घेऊन आणि त्याच वर्षी 15 ऑगस्टला रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले ’ आला तो वेगवेगळ्या संदर्भात आजही हिट आहे. या चित्रपटाने अ‍ॅक्शनपटाची लाट आली ( राजेश खन्ना मारधाडीला अनफिट) आणि मल्टी स्टार कास्ट चित्रपटाचे युग आले (जे राजेश खन्नाला मानवत नव्हते. सोलो हीरो हा त्याचा हट्ट आणि बाणा होता, आत्मकेंद्रीत राजेश खन्नाला ते मान्य नव्हतं. सगळे स्वतःभोवती हवे याची सवय आणि सातत्य सोडावे लागले असते ). राजेश खन्नाची प्रचंड मदार असलेल्या राज खोसला दिग्दर्शित ’प्रेम कहानी’ (1975) आणि शक्ती सामंता दिग्दर्शित ’मेहबूबा ’ (1976) या दोन्ही बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी चित्रपटांना रसिकांनी नाकारले आणि राजेश खन्नाची घसरण जाणवू लागली. गंमत म्हणजे या दोन्ही चित्रपटातील गाणी आजही
लोकप्रिय आहेत….
सुपर स्टार म्हणून रसिकांत लोकप्रिय होत जाताना तो मूळ व्यक्तिमत्व विसरला. भरपूर यश असेही परिणाम करते. मूळात तो अतिशय समंजस व्यक्ती आणि अभिनयाची उत्तम जाण असलेला कसलेला अभिनेता. पण ’एकामागोमाग एक सुपर हिट चित्रपटां’नी आपले मूळ व्यक्तिमत्व, सामर्थ्य, स्वभाव, शैली विसरला आणि जणू तो ’ आपण चोवीस तास राजेश खन्ना आहोत ’ अशा स्टाईनने वागू शकतो अशा फाजील आत्मविश्वासात बोलू, पाहू, सांगू लागला. सुपर स्टार राजेश खन्नाचे मग कोणत्याही स्थितीत ’आपण राजेश खन्ना आहोत ’ विसरता कामा नये असे झाले. आपल्या चित्रपटाच्या मुहूर्ताला अतिशय व्यवस्थित उशीराच येणे, शूटिंगला लेट करणे, दिग्दर्शकाला सतत सूचना देणे, निर्मात्याना तारखांसाठी रखडवणे, आपले चित्रपट पुढे मागे करणे अशा गोष्टी तो करु लागला आणि त्याचे हे वागणे उघडपणे असल्याने त्याची चर्चा रंगली, त्यावरुन किस्से/गोष्टी/कथा/दंतकथा वाढत अथवा पिकत गेल्या. त्याची इमेज ’लहरी आणि हेकेखोर’ अशी झाली. ’नमक हराम ’च्या सेटवर अमिताभ वेळेवर येई, पण तो कंटाळून जावा अशा पध्दतीने राजेश खन्ना उशीराच येई, जाणिवपूर्वक रिटेक वाढवे यावर बरेच लिहिले गेले. एका मुलाखतीत तो म्हणाला, सेटवर वेळेवर यायला मी काय क्लर्क आहे काय? (मी तर सुपर स्टार आहे हे त्यातून तो सुचवतो.)
चांगल्या कथेवरील चित्रपट हाच राजेश खन्नाला मोठा आधार होता हे उशिरा लक्षात आले. इस्माईल श्रॉफ दिग्दर्शित ’थोडीसी बेवफाई ’, मोहनकुमार दिग्दर्शित ’अवतार ’, सावनकुमार दिग्दर्शित ’सौतन ’, जे. ओम प्रकाश दिग्दर्शित ’आखिर क्यू’ ही उदाहरणे बोलकी आहेत. पण राजेश खन्ना स्वतःला फोकसमध्ये ठेवण्यासाठी पब्लिसिटी स्टंट करे. आपल्या आशीर्वाद फिल्म या बॅनरखाली त्याने ’मजनून ’ या चित्रपटाचा अक्षरशः जंगी मुहूर्त केला. वांद्रे स्टेशनबाहेर पडताच समोर ’मजनून ’चे भले मोठे होर्डींग्स दिसले, त्यावर म्हटले होते, एक नवा इतिहास घडतोय…. मेहबूब स्टुडिओ येईपर्यंत ’मजनून ’ची असंख्य पोस्टर आणि मग प्रत्यक्ष स्टुडिओत स्वागताला डिंपल सज्ज. त्या काळातील सर्व बडे निर्माते दिग्दर्शक वितरक मुहूर्ताला हजर दिसले आणि आमंत्रणारील वेळेपेक्षा दोन तास उशीर म्हणजे स्वाभाविक होतेच. आणि मग अतिशय देखण्या, खर्चिक, भव्य सेटवर संपूर्णपणे मेणबत्त्या आणि मग दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी राजेश खन्ना आणि राखी यांच्यावर प्रेमाची शेरोशायरीचा प्रसंग…. दृश्य ओके होताच प्रचंड टाळ्या आणि सुखावलेला राजेश खन्ना. आणि काही दिवस मिडियात याची भरपूर चर्चा. पण पुढे काय? ही अमर प्रेम कथा मुहूर्तालाच बंद पडली. असाच त्याचा हिंदी चित्रपटातील जेम्स बॉण्डपट ’झीरो झीरो सेव्हन ’ नावाचा अ‍ॅक्शनबाज मसालेदार चित्रपट. पद्मिनी कपिला त्याची नायिका होती. शंकर बी. सी. निर्मित आणि नरेंद्र बेदी दिग्दर्शित या चित्रपटाचाही धमाकेदार मुहूर्त बरेच दिवस गाजला, पण चित्रपट पुढे सरकलाच नाही. स्वतःला जमेल तितकं न्यूजमध्ये ठेवण्याचा तो आटापिटा करतोय हे लक्षात येत होते. पण एक चित्रपट मात्र असाच भारी मुहूर्त होऊनही पूर्ण होऊन पडद्यावर आला. तो होता ’रेड रोझ ’ ( 1980). दिग्दर्शक भारती राजाने आपल्या मूळ तमिळ चित्रपटाची हिंदीत रिमेक करताना मूळ नायक कमल हसनच्या हस्ते मुहूर्त केला. तोपर्यंत कमल हसन हिंदी चित्रपटसृष्टीत आला नव्हता. या चित्रपटासाठी राजेश खन्नाने आपला लूक बदलला. केस बारीक केले, गॉगल लावला, बोलण्याची ढब बदलली, महत्वाचे म्हणजे या चित्रपटात त्याने निगेटीव्ह व्यक्तिरेखा साकारली. हा सायकॉलॉजिकल थ्रीलर होता. पूनम धिल्लॉन नायिका होती. या धाडसी थीमला प्रेक्षकांनी नाकारले. पण राजेश खन्नाच्या या प्रयत्नांना दाद मिळाली. तरी चित्रपट यशस्वी होणे आवश्यक असतेच. चित्रपटाच्या जगात यशासारखे सुंदर आणि महत्वाचं काहीही नाही. ते मिळाले नाही की अडथळे निर्माण होतात. तेच राजेश खन्नाचे झाले.
कधी कधी राजेश खन्ना कोडे वाटायचा. खरं तर त्यानेच सत्तरच्या दशकात मिडियाला सेटवर शूटिंग कव्हरेजसाठी बोलवण्याचा ट्रेण्ड आणला. दुसरीकडे गॉसिप्सना खतपाणी घातले. तोच राजेश खन्ना कालांतराने त्याच्या चित्रपटाच्या सेटवर आम्ही सिनेपत्रकार गेल्यावर जाणीवपूर्वक अंतर ठेवून बसायचा आणि काय ते दिग्दर्शकाला विचारा असे कृतीतून दाखवून देई. तोच राजेश खन्ना आपल्या खारच्या ऑफिसामध्ये व्यवस्थित अपॉईनमेंट घेतली की हमखास भेटे. पण त्यासाठी किमान दीड दोन तास वाट पाह्यची तयारी हवी. पण त्याच्या ऑफिसमधील भरपूर आले आणि काही ड्रायफ्रूट कुटून टाकलेला गरम चहा तबियत खुश करे. त्या ऑफिसमधे मराठी वृत्तपत्र असल्याने वाटलेला आपलेपणा मग तो आज आपल्याला भेटत असलेला पत्रकार महाराष्ट्रीय आहे हे समजताच चांगल्या मराठीत बोले. त्यात मीही गिरगावकर आणि राजेश खन्नाचे गिरगावातील घर माहित असलेला त्यामुळे तो मनसोक्त मुलाखत देई. अधेमधे शिवी घातल्याशिवाय त्याला बोलता येत नसे, पण त्याला ते शोभत होते.
आपल्या चित्रपटाच्या सेटवर तो सवयीने उशीराच येई. आणि मग त्याच्या घरुन आलेल्या भल्या मोठ्या डब्यातील शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाला एका मोठ्या टेबलावर मांडले जाई. कधी जोडीला रुपेशकुमार, शफी इनामदार, ओम शिवपुरी यापैकी कोणी असे. अशातच तो आजूबाजूला पाही आणि कोणी दिसलाच तर विचारे, ’खाना खाया? ’ समोरचा हो अथवा नाही असे म्हणण्यापूर्वीच राजेश खन्ना त्याला प्लेट उचलायला सांगे.
राजेश खन्नातील असे अनेक चांगले गुण अनुभवता आले. मिडियाने मला हे दिले. त्याने आपल्या बॅनरखाली ’अलग अलग ’ ( 1985) ची निर्मिती करताना आपले मित्र शक्ती सामंता दिग्दर्शक, आनंद बक्षी गीतकार आणि राहुल देव बर्मन संगीतकार अशी टीम जमवली आणि मग त्याने निमिलेल्या चित्रपटात आपण फुकट गावू हे किशोरकुमारने दिलेले आश्वासन ’दिल मे आग लगाये सावन का महिना ’ हे गाणे गात पूर्ण केले याची भरपूर चर्चा रंगली. या चित्रपटात टीना मुनिम नायिका आहे तर आपली मुलगी ट्विंकल हिच्या हस्ते या चित्रपटाचा त्याने थाटात मुहूर्त केल्याचे आठवतेय. त्या काळात नवीन चित्रपटाचे मुहूर्त जणू इव्हेन्टस असत.
एक वेगळी आठवण सांगतो. एकदा गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत ’आवाम’च्या सेटवर शूटिंग कव्हरेजसाठी आम्हा सिनेपत्रकाराना बोलावले असता लंच ब्रेकमध्ये अचानक बाजूच्या ’इन्साफ’च्या सेटवरुन डिंपल आली आणि आम्ही सगळेच अचंबित झालो, फोटोग्राफर्सनी ताट बाजूला ठेवून कॅमेरा काढला, अहो ती चक्क राजेश खन्नाला भेटायला आली आणि ते पाहून शफी इनामदारही गोंधळून उभा राहिला. त्या काळात राजेश व डिंपल पटत नाही म्हणून वेगळे राहत असल्याने हे सगळे अनपेक्षित होते. ही तर ’ब्रेकिंग न्यूज ’च. हा फोटो त्या काळात भारी किंमतीत विकला गेला. गोष्ट छोटी वाटते पण महत्त्वाची आहे.
आपल्या ’जय शिव शंकर ’ (1988) या चित्रपटात त्याने नायिका म्हणून डिंपल कपाडियाची निवड करुन सगळ्याच आश्चर्याचा धक्का दिला. मला चांगले आठवतेय, गोरेगावच्या फिल्म सिटीतील देवळात या चित्रपटाच्या मुहूर्ताला डिंपल अगोदर आली आणि राजेश खन्ना थोडा उशीरा आला याचीही बातमी झाली. अजूनही ते एकमेकांपासून वेगळे राहत असल्याने ते प्रत्यक्षात एकाद्या चित्रपटासाठी एकत्र येणे ही भारी फिल्मी बातमी होती. एस. व्ही. चंद्रशेखर राव दिग्दर्शित या चित्रपटातील या दोघांसह जितेंद्र, पूनम धिल्लॉन, चंकी पांडे, संगीता बिजलानी हेही यावेळी हजर होते तरी सगळा फोकस राजेश खन्ना आणि डिंपलवर होता. आम्हा प्रत्येक पत्रकाराला राजेश खन्ना व्यक्तीशः भेटला हे तर केवढे विशेष ठरले. हा चित्रपट पूर्ण तर झाला अगदी पोस्टरही लागली आणि रिलीजच्या आदल्या दिवशी आशीर्वाद फिल्मच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड पडली आणि हा चित्रपट तसाच कायमचा डब्यात गेला….
नव्वदच्या दशकात राजेश खन्ना राजकारणातआला तो इंदिरा कॉग्रेसचा समर्थक झाला. 1991 च्या लोकसभा निवडणुकीत नवीन दिल्ली मतदारसंघातून तो भाजपचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांच्या विरोधात पराभूत झाला, पण अडवानी एकाच वेळेस गांधी नगर ( गुजरात) आणि नवी दिल्ली असे दोन्ही ठिकाणी विजयी झाले असल्याने त्यांनी दिल्लीचा राजीनामा दिला. मग पोटनिवडणुकीमध्ये त्याने भाजपचा उमेदवार शत्रुघ्न सिन्हाचा पराभव केला, विशेष म्हणजे यावेळी राजेश खन्नाच्या प्रचारात डिंपल आणि दोन्ही मुली ट्विंकल आणि रिंकी असा परिवार हजर असल्याचे फोटो वृत्त खूप गाजले. खासदार म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत अनेकांना मदत मात्र केली.
राजेश खन्ना म्हणजे बरेच काही. प्रभाकर निकळंकर दिग्दर्शित ’सुंदरा सातारकर ’ या मराठी चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारण्यापासून ते मेहमूदला ’जनता हवालदार ’च्या वेळी शूटिंगसाठी तारखाच न देण्यापर्यंत बरेच काही सांगता येईल. त्याचे दिग्दर्शक
(अगदी अपवाद प्रकाश मेहरा, सुभाष घई… योगच आला नाही), त्याच्या कॉन्ट्रोव्हर्सी ( अबब…. किती किती, ’रोटी ’च्या वेळी दिग्दर्शक मनमोहन देसाईंशी वाद), त्याच्या नायिका
(शर्मिला टागोर, मुमताज तर हुकमी पण नंतरच्या काळात स्मिता पाटीलसोबत ’अमृत ’, ’अनोखा रिश्ता ’, नजराना असे अनेक चित्रपट केले), त्याने अभिनित केलेली गाणी ( यह शाम मस्तानी….. कटी पतंगचे हे गाणे द बेस्ट), त्याचा संसार, त्यातली भांडणे त्यात तथ्य किती हा प्रश्नच होता. पण त्याची रोमॅन्टीक हीरो इमेज डॅमेज झाली), राजेश खन्ना हा कायमच कुतूहल आणि कौतुकाचा विषय राहिला आहे.
…..18 जुलै 2012 रोजी त्याच्या निधनाची बातमी समजताच आशीर्वाद बंगल्यावर गेलो तेव्हा समोर मिडिया आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी होती. राजेश खन्ना हा कदापि न संपणारा विषय…

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply