पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील मार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळीचा प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. हे खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. पनवेल तालुक्यातील सुकापूर-भगतवाडी आणि विहीघर ते कोप्रोली रस्ता, सुकापूर, वाकडी, खानाव मार्गे मोरबा, तळोजा औधोगिक वसाहत रस्ता, तसेच नवीन पनवेल कानपोली, वलप, टेंभोडे, वलवली मार्गे औद्योगिक वसाहतीमध्ये जाणारा रस्ता, सुकापूर, आकुर्ली, चिपळे, नेरे, वाजे रस्ता तसेच देहरंग धरणाकडे जाणारा रस्ता तसेच तळोजा एमआयडीसी ते नितळस रस्ता, कोन गावावरून रसायनीला जाणारा रस्ता या पनवेल ग्रामीण भागातील पनवेल शहराला जोडणार्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तळोजा नोडमधील घोट, पेंधर, घोट कॅम्प या गावात जाणार्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोरोना काळात निर्बंधांमुळे रहदारीवर परिणाम झाला होता, परंतु निर्बंधात शिथिलता झाल्या नंतर शहरासह ग्रामीण भागातील रहदारी ही वाढली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरावस्थेचा फटका रात्रीच्या अंधारात जास्त होत आहे. काही ठिकाणचा रस्ता पावसाने वाहून गेला आहे, परंतु तुरळक डागडुजी सोडली तर कुठल्याही प्रकारची कामे झाली नाहीत. खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वार रिक्षाचालक, एसटी व इतर वाहनांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या 10 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणरायांचे आगमन घरोघरी होणार आहे. तरी गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची डागडुजी करून घ्यावी. या संदर्भातील निवेदन ठिकठिकाणच्या नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल यांना दिले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper