संध्याकाळी नवीन पनवेल सेक्टर 15 मधील रस्त्यावरून गाण्याचा आवाज येत असतो. रोज संध्याकाळी ही गाणी कोण लावतो, असा प्रश्न मला पडत असे. आजही गाण्याचा आवाज आला म्हणून मुद्दाम बघितले तर महापालिकेच्या घंटागाडीवर लावलेल्या स्पीकरमधून गाण्याचा आवाज येत होता. स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यावर अनेक महापालिका आणि गावांत लोकांच्यात स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच हा प्रकार होता.
पनवेल महापालिकेतर्फे ही स्वच्छ सर्वेक्षण 2020 लोकाभिमुख होण्याकरिता आणि लोकांच्या स्वच्छतेविषयक वर्तणुकीत बदल घडवण्यासाठी माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कचरा वर्गीकरण व प्रक्रिया तसेच इतर स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत 300 स्वंयसेवक गृहनिर्माण सोसायट्यांत जाऊन नागरिकांना कचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आणि माहिती देणार आहेत. याचा फारसा उपयोग होईल असे दिसत नाही. कारण काही दिवसांपूर्वी एक नगरसेविका आणि पालिकेचे अधिकारी त्या भागातील पाणी काढण्यासाठी प्रयत्न करीत उभे असताना एका महिलेने त्यांच्या बाजूलाच कचरा आणून टाकला. त्यावेळी आपल्याकडेही स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी वर्हाडातील एका शहरात घंटागाडीवर चिअरगर्ल ठेवण्याची लढवलेली भन्नाट शक्कल वापरली तर, असा विचार मनात आला. त्या घंटागाडीवरील चिअरगर्लचे वर्णन एका कवीने केले आहे.
आमच्या गावात यंदा घंटागाडी सुरू झाली, पण आमच्या लोकांले अक्कल नाही आली. घंटागाडी आल्यावर कुणी कचरा नाई टाके जवा मूड करन तवा रस्त्यावर नेऊन फेके.
शेवटी नगरपालिकेने लढवली एक शक्कल, घंटागाडीवर ठिवल्या भल्या मस्त चिअरगर्ल. त्या येलून येलून नाचे मने कचरा घेऊन यावे, बायापेक्षा जास्त मंग माणसच तिथसा धावे,
घरातले निकाल कामं आता माणसंच करे, साफसफाई करून घंटागाडीची वाट धरे, घरासंग आता गल्याबी सप्पा राहाले लागल्या, हमेशा तुंबलेल्या नाल्या सरक्या वाहाले लागल्या,
दाढीबिढी करून सारे एकदम चकाचक राहे, त्यांच्यातली एखादी पटते का पटवून पाहे, कचरा नसला त्यारोजी माणसं परेशान फिरे, बाजूच्याचा अर्धा कचरा आपल्या पेटीत भरे,
पण बाया बेजा हुशार बारीक लक्ष कराच्या, नवरा जास्त उडला का बरोबर दम भराच्या, माणसंबी बिचारे आता तेवढ्यातच खूश रायते, जेवण नाही भेटलं तरी नुसते मेन्यूकडे पायते,
पुरं गाव सुधारलं म्हणून स्वच्छता स्पर्धेत पहिलं बक्षीस मारलं, पहिलं बक्षीस मारलं.
खरंच महाविद्यालयीन मुलांना स्वयंसेवक म्हणून नेमून जनजागृती करण्यापेक्षा ही शक्कल लढवली तर पनवेलमधील सोसायट्यांतील, गल्लीतील कचरा साफ होण्यास वेळ लागणार नाही, पण घंटागाडीच्या मागेपुढे गाड्यांची रांग लागल्याने वाहतूक कोंडी होईल. आम्ही गाववाले त्यामुळे आम्हीच पहिला कचरा टाकणार हा नवीन वाद सुरू होईल आणि तो सोडवताना पोलिसांच्या मात्र नाकी नऊ येतील हे मात्र खरे!
-नितीन देशमुख, फेरफटका
RamPrahar – The Panvel Daily Paper