माणगाव नगरपंचायतीचे दुर्लक्ष; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने शहरीकरणही वाढत आहे. पर्यायाने शहरात दैनंदिन निर्माण होणार्या घनकचर्याचा प्रश्नही तितकाच गंभीर बनत चालला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत निर्माण होणार्या या घनकचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी माणगाव नगरपंचायतीपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील नगरपंचायत प्रशासनाने हा कचरा उचलण्यासाठी टेंडर काढून एका ठेकेदाराला हे काम दिले होते. हा कचरा काही कामगारांमार्फत उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात होता. या कचर्याचे वर्गीकरण करून त्या कचर्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याचे प्रयोजन असताना हा कचरा उघड्यावर टाकल्याने तो अन्यत्र पसरून परिसरात रोगाची साथ येण्याची शक्यता असून नागरिकांचे तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी माणगाव नगरपंचायत या डम्पिंग ग्राउंडवर कचर्याचे वर्गीकरण करून खत निर्मिती करण्यासाठी कधी पाऊल टाकणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
माणगाव नगरपंचायत 2015च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने नगरपंचायतीत सत्ता आल्यास माणगाव नगरी स्वच्छ व सुंदर करून खत निर्मिती प्रकल्प राबविण्याचे जाहिरनाम्यातून जाहीर केले होते. त्याची वचनपूर्ती कागदावरच राहिली. माणगाव नगरपंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात असून शिवसेनेने तरी या घनकचर्याचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून या कचर्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाउल टाकावे, अशी मागणी होत आहे.
साथरोग पसरण्याची भीती
तत्कालीन नगरपंचायत प्रशासनाने कचरा उचलण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते. त्या ठेकेदारामार्फत कर्मचारी नेमून हा कचरा गोळा केला जात होता, तसेच या कचर्याचे वर्गीकरण सुका, ओला, प्लास्टिक व बाटल्या बाजूला करून नगरपंचायतीच्या जागेतील पाच एकर असणार्या डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावून खत निर्मिती करावयाचे प्रयोजन होते. ते आश्वासन अखेर आश्वासनच ठरले. डम्पिंग ग्राउंडवर हा कचरा उघड्यावर टाकल्याने हा कचरा हवेने तसेच मोकाट जनावरांमार्फत परिसरात पसरत असल्याने साथरोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper