
पनवेल : बातमीदार
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या आवारामध्ये घर कामगार आणि झाडूवाले यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याचा आदेश जारी करण्याची मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय दिनकर भोपी यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्या अनुषंगाने अनेक निर्बंध जारी करण्यात आले परंतु वेळोवेळी नागरिकांना उदरनिर्वाहासाठी होत असलेला त्रास आणि रोगाच्या प्रादुर्भावाचा प्रमाण याचा विचार करून बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर काही निर्बंध हटविण्यास देखील आलेले आहेत. पण वास्तविक पाहता अजूनही बर्याच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी शासनाच्या नियमांच्या नावाखाली स्वतःच्या मनाला वाटेल तसे नियम बनवुन सदर नियमांची अंमलबजावणी करत असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे घरकाम करणार्या मोलकरीण वर्ग आणि घराघरातून कचरा गोळा करणारे व इमारतीची साफसफाई करणारे झाडूवाले यांच्या उदरनिर्वाहबाबत विचार करून शासनाने सर्व गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व झाडूवाले यांना कामकाजा करिता प्रवेश प्रतिबंध करु नये असा आदेश जारी केलेला आहे. असे असताना देखील बहुतांश सोसायटीचे पदाधिकारी शासन आदेशाला बगल देत आहेत व घर कामगार आणि झाडूवाले यांना सोसायटी आवारात प्रवेश करण्यापासून रोखत आहेत. सोसायटी पदाधिकार्यांच्या स्वयंघोषित नियमामुळे हातावर पोट असलेल्या अनेक घरकाम करणार्या मोलकरिन वर्ग आणि झाडूवाले याना विनाकारण उपासमारीचा सामना करावा लागत आहे. तरी त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या आवारामध्ये घर कामगार आणि झाडूवाले यांना कोणताही प्रतिबंध न करता प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी संजय भोपी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper