मुंबई पोलिसांना आणि राज्यातील आघाडी सरकारला कायम धारेवर धरणार्या एका इंग्रजी वाहिनीवर टीआरपी घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन मराठी मनोरंजन वाहिन्यादेखील या प्रकरणात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. टीआरपीचा हा तथाकथित घोटाळा हास्यास्पद मानून सोडून द्यायचा की याला सुडाचे राजकारण म्हणायचे हे यथावकाश स्पष्ट होईलच.
जगातील सर्व समस्या संपल्याप्रमाणे काही टीव्ही वाहिन्यांना नवे खेळणे मिळाले आहे. हे नवे खेळणे आहे तथाकथित टीआरपीच्या घोटाळ्याचे. मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अचानक आपल्या पोतडीतून एक ‘घोटाळा’ बाहेर काढला. काही टीव्ही वाहिन्या विशिष्ट ग्राहकांना लाच देऊन आपलीच वाहिनी टीव्हीवर चालू ठेवण्याची सक्ती करत आहेत आणि हा प्रचंड घोटाळा आहे, असे मुंबई पोलिसांतर्फे जाहीर करण्यात आले. साहजिकच या आरोपामुळे टीव्ही जगतामध्ये मोठीच खळबळ उडाली. सर्व प्रथम ही टीआरपी नावाची काय भानगड आहे ते समजून घेतले पाहिजे. आपल्या देशामध्ये कोट्यवधी टीव्ही संच आहेत, असे गेल्या वर्षीची आकडेवारी सांगते. या टीव्ही संचांवर सतराशे साठ वाहिन्या चोवीस तास चालूच असतात. त्यातील काही वाहिन्या मनोरंजन करणार्या तर काही वृत्तवाहिन्या असतात. चित्रपट, माहितीपर लघुपट, क्रीडा वाहिन्या आदींचे विश्व आणखीनच वेगळे असते. देशभरात आजमितीला छोट्या-मोठ्या मिळून सुमारे 1600 वाहिन्या कार्यरत आहेत. बीएआरसी इंडिया म्हणजेच Broadcast Audience Research Council या संस्थेतर्फे या वाहिन्यांना टीआरपी (Television Rating Points) दिले जातात. कोणती वाहिनी प्रेक्षक किती वेळ पाहतात, कोणती वाहिनी किती प्रेक्षक पाहतात याचा लेखाजोखा ही संस्था ठेवते व त्या प्रमाणे प्रत्येक वाहिनीला रेटिंग देते. त्यासाठी देशभरात सुमारे 45 हजार टीव्ही संचांमध्ये बॅरोमीटर नावाचे यंत्र बसवलेले असते. अशी अवघी दोन हजार यंत्रे एकट्या मुंबईत आहेत. यातील काही घरांमध्ये विशिष्ट वाहिन्यांनी आपापली माणसे पाठवून आमचेच चॅनेल पहात रहा, असा आग्रह धरल्याचा आरोप आहे. यासाठी संबंधितांना महिनाकाठी चारशे ते पाचशे रुपये देऊ केल्याचेही समजते. मुंबई पोलिसांच्या ‘गौप्यस्फोटा’नुसार हा एक प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा आहे. कारण बेकायदा पध्दतीने आपले टीआरपी रेटींग वाढवून जाहिरातदारांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. वरील रामायण वाचल्यानंतर हा सगळा किती फुसका बार आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. ज्या इंग्रजी वाहिनीवर या घोटाळ्याचे आरोप होत आहेत त्या वाहिनीने बॉलिवुड अभिनेता सुशांसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांचे आणि राज्य सरकारचे भरपूर वाभाडे काढले होते. त्याची शिक्षा म्हणूनच मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात चौकशीचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या तथाकथित घोटाळ्याप्रकरणी कोणतीही वाहिनी दोषी आढळल्यास त्यांच्यावर बेलाशक कारवाई करावी, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत पाहता राज्यासमोरील सारे गंभीर प्रश्न हवेत विरुन गेले आहेत आणि सर्वत्र आबादीआबाद आहे अशा समजुतीतून नवे निरर्थक घोटाळे बाहेर काढण्याचे उद्योग सुरु आहेत, असा सूर सर्वसामान्य लोक लावीत आहेत. चॅनेलवाल्यांच्या टीआरपीच्या या भांडणात त्रास होतो तो सामान्य प्रेक्षकांनाच. हे प्रकरण जसे अचानक उपटले तसेच ते एक दिवस हवेत विरुन जाईल, अशीच चिन्हे दिसतात.
RamPrahar – The Panvel Daily Paper