उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत सध्या कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील डाऊरनगर भागातील नागरिकांचा केरकचरा उरण-करंजा रहदारीच्या रस्त्यावर टाकण्यात येत आहे. या कचर्याच्या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे या रस्त्यावरून वाहनचालकांना व पादचार्यांना नाक मुठीत घेऊन जावे लागत आहे. या दुर्गंधीयुक्त कचर्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत ही सर्वाधिक मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात असून या ग्रामपंचायत हद्दीमध्ये करंजा, चाणजे, मुळेखंड, बालई, काळा धोंडा, कोंढरी, कासवले व डाऊरनगर या गावांचा समावेश आहे. ग्रामपंचायत परिसर विस्तीर्ण व लोकसंख्येची घनता जास्त असल्याने या ग्रामपंचायत हद्दीतील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार आहेत.
घंटागाडीतून दररोज कचरा उचलला जातो, असा ग्रामपंचायत प्रशासनाचा दावा असला, तरी या ग्रामपंचायत हद्दीतील डाऊरनगर येथील रहदारीच्या रस्त्यावर नागरिकांनी टाकलेला कचरा गेले अनेक दिवस उचलला नसल्याचे दिसून येत आहे. त्या कचर्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली आहे, तसेच या कचर्याच्या दुर्गंधीमुळे पूर्वेला उरण एसटी डेपोमध्ये ये-जा करणार्या अनेक प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत.
त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्याही गायब झालेल्या दिसत आहेत. पर्यायी कुंड्या नसल्याने कचरा रस्त्यावर फेकावा लागतो, असे तेथील जनतेचे म्हणणे आहे, मात्र ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे रस्त्यावरून जाणार्या जनतेला दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने जनता त्रस्त झाली आहे.पर्यायाने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper