Breaking News

चिंताजनक! नवी मुंबईत मृत्यूदर वाढला; दोन महिन्यांत 150 जणांनी गमावले प्राण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या दैनंदिन वाढीमुळे आरोग्य सुविधांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा घटले आहे. यातच कोरोनामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण सुध्दा चिंताजनक आहे.  नवी मुंबईतील मृत्युदरात वाढ झाली असून दोन महिन्यांत 150 जणांनी आपले प्राण गमावले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वांगीण प्रयत्न सुरू आहेत, मात्र मृत्यूदर रोखण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. नवी मुंबईत कोरोनाची स्थिती भयावह बनली आहे. दररोज हजार ते दीड हजार रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत आहे. यातच ऑक्सिजन बेडची कमतरता आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आदी मुळे अनेक रूग्णांची परवड होत आहे. परिणामी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत मृत्यू दर कमी करण्यात महापालिकेला चांगलेच यश आले होते. विशेष म्हणजे या कालावधीत दैनंदिन मृत्यूचा आकडा शून्यावर आला होता, मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यूचा दर वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी पाच ते नऊ रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी मृत्यूदर रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सक्षम उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठित केली होती. त्यामुळे मृत्यूदर कमालीचा खाली आला होता, परंतु कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक ठरत असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे 3 जानेवारी 2021 रोजी एकूण कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 1059 इतकी होती, मात्र मागील तीन महिन्यात मृतांचा आकडा 1260 इतका झाला आहे. तर 18 फेब्रुवारी 2021 ते 17 एप्रिल 2021 या दोन महिन्याच्या कालावधीत जवळपास दीडशे जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांत व त्यांच्या नातेवाइकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आमदार गणेश नाईक यांच्या आयुक्तांना सूचना

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपायोजना कराव्यात, अशी परखड सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 17 एप्रिल रोजी पत्र पाठवून गणेश नाईक यांनी कोरोना रूग्णांची वाढती संख्या पहाता सर्वांना वेळेत उपचार द्यावेत आणि कोरोनाचे संभाव्य मृत्यू टाळावेत, असे सांगितले आहे. आमदार नाईक हे आयुक्त बांगर यांच्याबरोबर नियमितपण कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या आढावा बैठका घेत असतात. या बैठकांमधून ते पालिका प्रशासनाला कोरोना नियंत्रणासाठी सूचना करत असतात. याच अनुषंगाने नाईक यांनी म्हटले की, पालिका प्रशासनाकडून त्यांना योग्य कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासित केले जाते, परंतु काही स्तरांवर पालिका कमी पडत असल्याचे दिसून येते आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वाढत आहे. कोरोना मृत्यूदर वाढताना दिसतो आहे. साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड इत्यादींची उणीव जाणवते आहे. केअर सेंटर कमी पडत आहेत. गंभीर रुग्णांसाठी जीवरक्षक ठरलेले रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. अशा प्रकारच्या असंख्य तक्रारींचा पाढा गणेश नाईक यांच्याकडे नागरिकांनी वाचला आहे. नाईक यांनी या समस्यांची गंभीर दखल घेतली आहे. सर्व प्रकारच्या बेडची संख्या, कोविड सेंटरची संख्या आणि रेमडेसिवीर सारख्या औषधांची उपलब्धता वाढविण्याची मागणी त्यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर वाढणारे कोरोना मृत्यू टाळण्यासाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्याची सुचनाही त्यांनी केली आहे. नवी मुंबईतील एकही रुग्ण उपचाराअभावी मागे राहता कामा नये. सर्वांना वेळेत उपचार मिळायला हवेत, अशी सूचना गणेश नाईक यांनी केली आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply