चिंता वाढत आहे…

शुक्रवारी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या हजाराचा टप्पा ओलांडून 1007 इतकी झाली. गेल्या 24 तासांत देशाच्या या आर्थिक राजधानीत 218 नव्या रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे यापैकी 60 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाबाधेची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. म्हणजेच हे रुग्ण सायलेंट कॅरिअर्स आहेत. सगळ्यांच्याच दृष्टीने ही बाब चिंता वाढवणारी आहे.

डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान प्रांतातील एका मार्केटमध्ये रहस्यमय विषाणूच्या स्वरूपात अवतरलेल्या कोरोनाला एव्हाना 100 दिवस पूर्ण झाले असून या घातक विषाणूने जगभरात 95 हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. जगात सर्वच आघाड्यांवर पुढे असणार्‍या महासत्ता अमेरिकेनेच जिथे या विषाणूसमोर गुडघे टेकले आहेत तिथे इतर लहानसहान देशांची काय अवस्था? अमेरिकेत आजघडीला तब्बल चार लाख 68 हजार कोरोनाबाधित आहेत. त्याखालोखाल एक लाख 57 हजार इटलीमध्ये, तर स्पेनमध्ये एक लाख 43 हजार रुग्ण आहेत. भारतासारख्या विकसनशील देशाने कोरोनासंदर्भात राबवलेल्या उपाययोजनांचे जागतिक स्तरावर कौतुक होत असले तरी भारतातली कोरोनाबाधितांची आकडेवारी इथून पुढे वेगाने वाढण्याची भीतीही काही अहवालांत व्यक्त केली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगाने आणि खंबीरपणे निर्णय घेऊन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पावले उचलली. जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक स्तरांवर मोदीजींच्या या प्रयत्नांचे कौतुक केले गेले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटत असतानाच तबलिगी जमातच्या दिल्लीतील कार्यक्रमातून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला. मुंबईसारख्या महानगरात एका टप्प्यावर 30 टक्के रुग्ण हे तबलिगींशी संबंधित असल्याचे आढळून आले. मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनताना दिसत आहे. शासकीय यंत्रणा, पोलीस यांच्याकडून परोपरीने आवाहन केले जात असूनही भाजी, किराणा सामान घेणे, बँकेतील व्यवहार आदी सबबींखाली अजूनही लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. गेल्या 24 तासांत मुंबईत 10 जणांचा कोविड-19मुळे बळी गेला असून खारघर येथे एका रिक्षाचालकाचा कोरोना बाधेमुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण बळींची संख्या 97 झाली आहे. आकडे वाढता वाढता किती भयावह टप्प्यावर जाऊ शकतात हे अमेरिकेकडे पाहिले असता सहज ध्यानात येते. तिथे आता कोरोनाबळींचे दफनविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने न्यूयॉर्कजवळच्या एका बेटावर कालव्यासारखा खड्डा खणून शवपेट्यांना पुरले जात आहे. खरंतर वृत्तवाहिन्यांमार्फत हे सारे लोकांपर्यंत पोहचत आहे. तेव्हा लोकांनी आपल्या सरकारी यंत्रणांचे कळकळीचे आवाहन गंभीरपणे घ्यायलाच हवे, परंतु मुंबई असो वा ग्रामीण भाग, कित्येक लोकांना अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य कळले असावे असे दिसत नाही. विशिष्ट समाजाकडून धार्मिक कार्यक्रमांकरिता एकत्र येण्याचा अट्टाहास अद्यापही सुरू आहे. त्या धर्मातील सेलेब्रिटी, विचारवंत, धर्मगुरू आदींनी पुढाकार घेऊन यासंदर्भात जनजागृती करायला हवी. तरच पोलीस, आरोग्यसेविका यांच्यासंदर्भातील हिंसक वा आक्षेपार्ह वर्तनाला आळा बसू शकेल. कित्येक राज्यांनी लॉकडाऊन वाढवला जावा, अशी विनंती पंतप्रधानांकडे यापूर्वीच केली आहे. ओडिशा, पंजाब या राज्यांनी तर लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणाही केली आहे. पंतप्रधान शनिवारी यासंदर्भात देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करतीलच. चिंता वाढत आहे. तेव्हा सर्वांनीच जबाबदारी ओळखून स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेण्याची नितांत गरज आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply