Breaking News

चित्रकर्मी पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम! -संगीतकार अच्युत ठाकूर

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा यंदाचा ‘चित्रकर्मी’ हा मानाचा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कोपर गावचे मूळ रहिवासी असलेले सुप्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर यांना जाहीर झाला आहे. 19 ऑगस्ट रोजी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर येथे एका विशेष कार्यक्रमात तो त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत असून त्यानिमित्त गेल्या 40 वर्षांच्या त्यांच्या सांगितीक प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

“वडिलांकडून केवळ 10 रुपये घेऊन गाणं शिकण्यासाठी मी मुंबईत आलो. गाणं शिकता, शिकता संगीतकारही व्हावं, असं सारखं वाटायचं, नव्हे ते माझं स्वप्न होतं! गेल्या चार दशकांचा प्रवास पाहता हे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. या सांगितीक प्रवासात मी प्रतिकूल परिस्थितीतही गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ होऊन आज जवळजवळ 40 चित्रपटांना संगीत दिले आहे, तर 20 नाटके संगीतबद्ध केली आहेत. ‘जांभूळ आख्यान’ हे मी संगीतबद्ध केलेले नाटक आज 30 वर्षे चालू आहे, तर ‘पैज लग्नाची’ आणि ‘मर्मबंध’ या चित्रपटांना संगीतकार, गायक म्हणून मला दोन-दोन राज्य पुरस्कार मिळून माझे नाव गायक व संगीतकार म्हणून सर्वतोमुखी झाले आहे. शिवाय काही मालिकांनाही मी संगीत दिले आहे. त्याही मालिका खूप गाजल्या. खरंतर या कलेने मला प्रतिष्ठा व नावलौकिक, आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. त्यामुळे आज मी समाधानी आहे. आज अ. भा. चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व मातृ संस्थेकडून मिळालेला पुरस्कार आहे. तो स्वीकारताना मला खूप आनंद होईल.” सुप्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर आपल्या सांगितीक प्रवासाविषयी दिलखुलासपणे बोलत होते.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी हा मानाचा पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

अलिबाग तालुक्यातील कोपर गावच्या या सुपुत्राने अतिशय जिद्दीने, परिश्रमपूर्वक मेहनत करून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत या संगीत क्षेत्रात बराच नावलौकिक मिळवला. आपल्या सुमधूर आवाजाने अनेक गाणी गाऊन हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. अशा या संगीतकार, गायकाला अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार मिळणे म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या सांगितीक कलेचा गौरवच म्हणावा लागेल.

“लहानपणापासूनच मला संगीताची आवड होती. या क्षेत्रातील माझे गुरू पं. प्रभाकर म्हात्रे (पेझारी), आचार्य डी. पी. अडसूळ, खाँ साहेब गुलाम खाजाँ, पं. यशवंतबुवा जोशी, वैै. विश्वनाथ मोरे.” अच्युतराव अभिमानाने सांगत होते.

विश्वनाथ मोरेंकडे मी सात वर्षे सहाय्यक म्हणून काम करीत होतो. या काळात मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. संगीतातील बारकावे न्याहाळता आले. स्वरातील चढ-उतार, हरकती कशा घ्याव्यात, आलाप, तान घेताना कोणती काळजी घ्यावी हे सारं मला त्यांच्याकडून शिकता आलं. त्यामुळे आपण स्वत:ही एखाद्या काव्याला संगीत देऊ शकतो, हा विश्वास माझ्यात निर्माण झाला. तसा मी पुढे प्रयत्नही केला.

सर्वप्रथम 1983 साली ‘श्री रामायण’ हा मराठी चित्रपट मी संगीतबद्ध केला. त्यातली गाणी अनेकांना आवडली. त्यानंतर ‘सौभाग्य वैंकण’, ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’. ‘सत्ताधीश’, ‘गृहलक्ष्मी’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘आता लग्नाला चला’, ‘सर्जा राजा’, ‘मर्मबंध’, ‘चिमणी पाखरं’ अशा अनेक चित्रपटांना मी संगीत दिले. ‘चिमणी पाखरं’ हा चित्रपट तर गाण्यांसाठी खूप गाजला. या चित्रपटातील

माया मंदिर हलले। लागे कळस कुटाया

आज घायाळ पक्षिणी। जाई पिलांना भेटाया

हे गाणं तर त्या वेळी फार लोकप्रिय झालं होतं.

अनेक नाटकांनाही मी संगीत दिले आहे. ‘चूप गुपचूप’, ‘नटरंग’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘जांभूळ आख्यान’ तसेच आगरी भाषेतलं ‘हा वनवा ईझेल का’ ही नाटके रंगभूमीवर फार गाजली. विशेषत: ‘तीन पैशांचा तमाशा’ व ‘जांभूळ आख्यान’ ही नाटके रसिकांना फारच आवडली.

1989 साली एकदा ‘जांभूळ आख्यान’ नाटकाच्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे आले होते. त्यांनी हे नाटक पाहिलं आणि या नाटकाचं संगीत त्यांना इतके आवडलं की, त्याच दरम्यान ते त्यांच्या ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाची जुळवाजुळव करीत होते. ह्या नाटकासाठी संगीतकार म्हणून पु.लं.नी तत्काळ अच्युत ठाकूर यांची निवड केली. हा अच्युतरावांच्या संगीताचा बहुमानच होता.

गेल्या 35-40 वर्षांच्या कारकिर्दित अच्युतरावांना अनेक मान्यवरांचे आशीर्वाद लाभले आहेत. थोर संगीतकार, गायक सुधीर फडके यांनी तर 1972 साली त्यांना सांगितले होते की, तू मुंबईत येऊन गाणं शिक, उद्याचा चांगला गायक होशील. सुधीर फडके यांचे हे शब्द अच्युत ठाकूर यांनी आज खरे करून दाखविले आहेत.

1984 साली नागपूरमध्ये एका कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासमोर अच्युतरावांनी आपल्या सुमधूर आवाजात महाराष्ट्र गीत गायले. तेव्हा वसंतदादांनी हे गीत ऐकून ‘अंगावर रोमांच उभे राहिले,’ या शब्दांत त्यांचा गौरव केला, तर त्याच वर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका कार्यक्रमात त्यांचं गाणं ऐकल्यानंतर ‘तू उद्याचा निश्चित मोठा कलावंत होशील,’ अशी भविष्यवाणी वर्तविली. अच्युत ठाकूर यांच्यातील कलागुण अशा पद्धतीने अनेकांनी त्या वेळी हेरले होते.

आज ज्येष्ठ संगीतकार व गायक म्हणून ते ओळखले जातात. त्यामागे त्यांची जिद्द, परिश्रम व चिकाटी हे गुण कारणीभूत आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अनेक सुप्रसिद्ध गायक-गायिकांनी गायली आहेत. त्यात सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, देवकी पंडित, आशा खाडिलकर, साधना सरगम, पैैय्याज, त्यागराज खाडिलकर, आरती अंकलीकर, वैशाली मांडे, शरद जांभेकर, स्वप्नील बांदोडकर, मिलिंद शिंदे, उर्मिला धनगर अशा अनेकांचा समावेश आहे.

पुरस्कार मिळवण्यातही ते कमी नाहीत. आजपर्यंत त्यांना सहा राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच 1992 साली अ. भा. मराठी नाट्य परिषदेचा उत्कृष्ट संगीतकार म्हणून, तर 1996मध्ये मुंबई महापालिकेचा उत्कृष्ट संगीत शिक्षक म्हणून महापौर पुरस्कार व रायगड जिल्हा परिषदेचा ‘रायगड भूषण’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

मुंबई आकाशवाणीचे उच्च श्रेणीप्राप्त सुगम संगीत गायक व संगीतकार, कवी असणार्‍या अच्युत ठाकूर यांनी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग व भारत सरकारतर्फे  आयर्लंड येथे साजरा झालेल्या जागतिक महोत्सवात गायक म्हणून सहभाग घेतला आहे, तर मॉरिशस येथे जागतिक सागर महोत्सवात प्रमुख गायक म्हणून भाग घेतला आहे. त्यांनी आजवर महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच आसाम, नागालँड, उत्तर प्रदेश, दिल्ली, काश्मीर, प. बंगाल इत्यादी भारतातील अनेक राज्यांत सुगम व लोकसंगीताचे कार्यक्रम सादर केले आहेत.

मराठी लोकगंगा, सूर तेच छेडीता या कार्यक्रमांबरोबरच युवक बिरादरी आणि इंडियन नॅशनल थिएटर या संस्थांमधूनही त्यांनी देशाच्या विविध भागांत कार्यक्रम केले आहेत. अशा या गुणी गायक व संगीतकाराचा अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे  ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन होत असलेला गौरव महाराष्ट्रातील रसिकांना विशेषत: रायगडवासीयांना अभिमानास्पद वाटेल असाच आहे.

आज ते मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात सुगम संगीताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून अनेक नवोदितांना गायकीचे प्रशिक्षण देण्याचे काम ते करीत आहेत.

त्यांचे अनेक शिष्यही आज या संगीत क्षेत्रात नावारूपाला आले आहेत. त्यात उर्मिला धनगर, संगीतकार नीलेश मोहरीर, मोना कामत, विद्या करलगीकर, अनरब चक्रवर्ती यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

बाळासाहेब निकम दिग्दर्शित ‘तुझा दुरावा’ हा त्यांनी स्वरबद्ध केलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून राजदत्त दिग्दर्शित ‘विठाबाई’ या चित्रपटाला संगीत देण्याचे काम सध्या सुरू आहे. याविषयी बोलताना अच्युतराव म्हणाले की, राजदत्त हे दिग्दर्शन करीत असलेल्या चित्रपटाला संगीत देणे हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वेगळा अनुभव आहे. अशा या गुणी गायक, संगीतकाराच्या पुढील वाटचालीस

हार्दिक शुभेच्छा!

-दीपक रा. म्हात्रे (ज्येष्ठ पत्रकार)

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply