
उरण ः प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली आक्कादेवीच्या माळरानावर झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आला आहे. दरवर्षी या दिवशी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा शासकीय इतमामात साजरा करण्यात येणारा कार्यक्रम कोरोनाच्या सावटाखाली आला आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलना अंतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याचवेळी चिरनेर येथेही 25 सप्टेंबर 1930 साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते. शांततामय रितीने सुरू असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी, आगरी, आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते.
यात 20 ते 22 वयोगटातील युवकांचाच अधिक भरणा होता. जंगल का कायदा तोड दिया, इंग्रज भारत छोडोचा नारा देत आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादु कातकरी दोघेही चिरनेर, आलू बेमट्या म्हात्रे – दिघोडे, आनंदा माया पाटील – धाकटी जुई, रामा बामा कोळी – मोठी जुई, रघुनाथ मोरेश्वर शिंदे (न्हावी) – कोप्रोली, परशुराम रामा पाटील – पाणदिवे व हसुराम बुद्धाजी घरत – खोपटे या उरण तालुक्यातील हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
या लढ्यात उरण तालुक्यातील धारातिर्थी पडलेल्या हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरातील त्यांच्या मूळगावी उभारली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील या महत्त्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे सर्वांना स्मरण व्हावे यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. हुतात्म्यांच्या वारस, कुटुंबातील सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात येतो. या वेळी लोकप्रतिनिधी, मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पुढारी, नेते, नागरिक, विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते, मात्र ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिनाचा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, परंतु दरवर्षी 25 सप्टेंबरला साजरा करण्यात येणार्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम सध्या कोरोनाच्या सावटाखाली आला आहे.
दरम्यान, 25 सप्टेंबरला साजरा करण्यात येणारा स्मृतिदिनाचा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा करावा यासाठी शासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी दिली आहे.कार्यक्रमावर होणार्या खर्चासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे निधीसाठी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून येणार्या आदेशानुसार कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याची माहितीही गटविकास अधिकारी गाडे यांनी दिली आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत व सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. हुतात्म्यांना बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली जाईल, मात्र यावर्षी गर्दी टाळून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिक, मान्यवरांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार नसल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper