Breaking News

चोळई गाव बनलेय दरडग्रस्त, अपघातप्रवण क्षेत्र

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण क्षेत्र आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. हे दुहेरी संकट ओढविण्यामागे प्रशासनच कारणीभूत आहे. नैसर्गिक आपत्ती या सबबीखाली या गावावर ओढविणार्‍या आपत्तींचे वर्णन करून आजमितीस सर्व संकटांना पांघरूण घालून बळींच्या वारसांना मदत आणि आपत्तीप्रवण क्षेत्रात वास्तव्य करणार्‍यांचे स्थलांतर एवढेच काम आपत्तीनिवारण कक्षामार्फत केले गेले आहे. चौपदरीकरणच्या आधीपासूनच अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या चोळई गावाच्या घाटरस्त्याच्या मार्गिकांचे नवे स्वरूप अपघात टाळण्यासाठी होण्याऐवजी नवीन चार पदरी रस्त्यांनाही अपघातप्रवण असा शिक्का बसेल एवढे अपघात गेल्या काही आठवड्यांपासून चोळई गावालगत कशेडी घाटातील तीव्र उताराच्या घाटरस्त्यामध्ये झाले आहेत.पोलादपूरपासून गोव्याच्या दिशेने केवळ एक कि.मी. अंतरावर चोळई गावापासून कशेडी घाटातील तीव्र वळणांना सुरूवात होते. साधारणत: कशेडी टॅप वाहतूक पोलीस चौकीपर्यंतचे 12 कि.मी.अंतर आणि तेथून पुढे खेड तालुक्यातील 8 कि.मी. अंतराचा असा एकूण 20 ते 21 कि.मी. अंतराचा हा कशेडी घाट सातत्याने धोकादायक ठरला आहे. जीवघेण्या अपघातांचे सातत्य टिकवून आहे. याचसोबत कशेडी घाटात दरवर्षी रस्ता रूंदीकरण, धोकादायक वळणे कमी करणे, तीव्र उतार कमी करणे, साईडपट्ट्यांचे मजबूतीकरण, दूतर्फा गटारांची कामे, संरक्षक कठडे आदी विविध कामे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असल्याचेही सातत्याने दिसून आले आहे. मात्र, या कामांचा अपेक्षीत परिणाम दिसून येत नाही. यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. कशेडी घाटाच्या सुरूवातीस वसलेल्या चोळई गावाच्या हनुमानमंदिरालगतच्या संरक्षक कठड्याला ठोकरून अनेक महाकाय कन्टेनर, टँकर्स, जीप, व्हॅन आदी वाहने गावाच्या बुरूड समाजाच्या लोकवस्तीपर्यंत झेपावत असतात. त्यामुळे या गावावर अपघातांची कायम टांगती तलवार असल्याचे सूचित करीत आहे. मात्र, तरीही संबधित विभागामार्फत या अपघातांची गांभिर्याने दखल घेण्यात आलेली नाही. अद्याप अपघातांची मालिका ही कायम सुरू आहे. या वळणांवरील गोव्याकडून घाटरस्ता उतरणार्‍या वाहनांना मुंबईकडून जाणार्‍या वाहनांचे अचानक दर्शन होऊन तोपर्यंत अपघात घडत असल्याचे अनेकदा पोलीस पंचनाम्यामध्ये उघड झाले आहे. दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री आदिती ठाकरे यांचा याबाबत दौरा झाला होता. यावेळी कशेडी घाटातील अपघातांबाबत तसेच धोकादायक प्रवासासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच आयुक्त उपस्थित होते. मात्र पालकमंत्र्यांच्या सूचनांना हरताळच अधिकार्‍यांनी फ ासल्याचे दिसून येत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे चांगलेच फावले आहे. चोळई गावातून चारपदरी रस्त्याचे काम सुरू झाले आणि तरीही हे काम अपघातप्रवण क्षेत्र असा शिक्का पुसू शकले नसल्याने प्रशासन सातत्याने घडणार्‍या अपघातांच्या घटनांची तसेच अपघात झाल्यानंतर प्रसिध्द होणार्‍या बातम्यांचीही दखल घेत नसल्याचे उघड झाले आहे. गेल्या दोन तीन वर्षांमध्ये सडवली ग्रामपंचायत हद्दीतील चोळई गावांतील राष्ट्रीय महामार्गालगतची लोकवस्तीदेखील दरडग्रस्त होण्यासारखी परिस्थिती सततच्या माती उत्खननानंतर निर्माण झाली असून गेल्याच वर्षी महाडच्या सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळण्याची दूर्घटना रात्री घडण्याच्यापूर्वीच सकाळी चोळईतील एका ढाब्यावर दरड कोसळून ढाबामालक उदय चिकणे याचा दरडीखाली मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अद्याप याठिकाणी मोठया प्रमाणात माती उत्खनन सुरू असून हा धोका अद्याप कायम राहिला आहे. पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांलगत डोंगरउतारावरील तसेच डोंगरमाथ्यावरील जमिनींची विक्री गेल्या काही वर्षांपासून मोठया प्रमाणात झाल्यानंतर या जमिनींपर्यंत पोहोचण्यासाठी माती उत्खनन करून रस्त्याची निर्मिती मोठया प्रमाणात झालेली दिसून येत आहे. दरम्यान, गेल्यावर्षी महाड, पोलादपूरमध्ये आलेल्या अतिवृष्टीतील आपत्तींमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या तालुक्यामध्ये तत्काळ पोचून अनेक आपत्तीग्रस्तांना मोठी मदत केली होती. याची आठवण आजही सर्वांच्या मनात आहे. पोलादपूर तालुक्यात यंदा रात्रीपासूनच धुवाँधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली. गेल्यावर्षी याठिकाणी उत्खननामुळे दरडीचा धोका लक्षात घेऊन चोळईच्या ग्रामस्थांनी उठाव केला होता. मात्र, त्यावेळी अतिवृष्टीकाळात दरड न कोसळल्याने कोणताही संघर्ष झाला नव्हता. यंदा पावसाचा जोर वाढताच चोळई येथील या उत्खननाच्या ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षेचा उपाय म्हणून चोळई येथील 20 कुटुंबांतील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्यामंदिर पोलादपूर येथे हलविले असल्याचा दावा केला आहे. मात्र, याठिकाणी अनेक ग्रामस्थांनी जीवाच्या भितीने आपआपल्या परगावांतील नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गाव आणि ग्रामस्थ रिकामे करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले. मात्र या घटनाक्रमांमध्ये प्रशासनाने ’हम करे सो कायदा’ अशी भुमिका घेतल्याचे दिसून आल आणि तशी चर्चा सुरु आहे. दरडी कोसळल्याच्या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगराचा भाग कापण्यात आला आहे. पावसामुळे दरडीचे ढिगारेच्या ढिगारे दगड मातीसह महामार्गावर खाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले. पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला सडवली फाटा-चोळई येथून सुरूवात होत असून या ठिकाणापासून कशेडी घाटामध्ये अनेक ठिकाणी वाहने कलंडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अनेकवेळा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहने चालविल्याबद्दल वाहनचालकांविरूध्द गुन्हे दाखल करणार्‍या पोलिसांनी हा कशेडी घाटरस्ता ज्या विभागाकडे आहे; त्या विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी करावी. वाहनांची तीव्र वळण उतारांवरून येण्याची क्षमता असते त्यापेक्षाही बिकट असे वळणउतार या घाटात तयार करून अपघातप्रवण क्षेत्राची निर्मिती करून अनेकांना जीवास मुकण्यास कारणीभूत ठरल्याबाबत या संबंधितांवर दोषी ठरल्यास गुन्हा दाखल करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कशेडी घाटातील सद्यस्थिती लक्षात घ्यावी आणि उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी नागरिकांकडून आता नवीन सरकारकडे होऊ लागली आहे.

-शैलेश पालकर

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply