शेवटच्या सुट्यांमध्ये किल्ल्यावर अलोट गर्दी
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला हा सोमवार (दि. 29)पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटचा शनिवार-रविवारची सुट्टी साधून पर्यटकांनी किल्ला पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती.
मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वारजवळ मोठी गर्दी झाली होती. त्यातच पावसाळा जवळ आल्याने लाटांचा प्रवाह वाढल्याने शिडाच्या बोटी हेलकावे घेत असल्याने किल्ल्यावर उतरणे जीकिरीचे झाले होते, परंतु थोड्या संयमाने पर्यटक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उतरत होते.
किल्ल्यावर गर्दी झाल्याने असंख्य पर्यटकांनी शिडाच्या बोटींमधून किल्ल्यास प्रदक्षिणा घालून किल्ल्याचे रूप बाहेरून पाहण्यात समाधान करून घेतले. सोमवारपासून हा किल्ला तीन महिने बंद राहणार असून सप्टेंबर महिन्यात पुन्हा याची दालने उघडणार आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper